दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हैशी, कोल्हापूरात रंगला म्हैशींंचा अनोखा ‘रोड शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 06:43 PM2018-11-09T18:43:12+5:302018-11-09T18:49:59+5:30
मालकाने दिलेली हाक, हलगीचा कडकडाट अन् सायलेन्सर काढून कानठळ्या बसविणारा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हशी अशा उत्साहात शुक्रवारी सागरमाळ परिसरात म्हैसपूजनाचा थरार रंगला. विशेष म्हणजे जन्नती, पवन, सरदार, राणी, लक्ष्या, उडान, राजा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कोल्हापूर : मालकाने दिलेली हाक, हलगीचा कडकडाट अन् सायलेन्सर काढून कानठळ्या बसविणारा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हैशी अशा उत्साहात शुक्रवारी सागरमाळ परिसरात म्हैसपूजनाचा थरार रंगला. विशेष म्हणजे जन्नती, पवन, सरदार, राणी, लक्ष्या, उडान, राजा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या अनोख्या रोड शोचे आयोजन दीपावली पाडव्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा म्हैस व दुग्ध व्यावसायिकधारक असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. हा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाल्याने सागरमाळ, रेड्याची टक्कर हा परिसर अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता.
पाडव्यानिमित्त पंचगंगा घाट, शनिवार पेठ, गवळी गल्ली, सम्राट चौक, कसबा बावडा, आदी ठिकाणी म्हैसपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी सागरमाळ परिसरातील सागरोबा देवस्थान येथे म्हैसपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्त म्हैसमालकांनी आपल्या म्हशींना पंचगंगा नदीघाटावर स्नान घालून त्यांना रंगीबेरंगी रंगांनी रंगवून, शिंगांवरही मोरपिसांसह रंगीबेरंगी फुगे, रिबन बांधून, अंगावर झूल टाकून या रोड शोमध्ये आणले होते. गुरुवारी (दि. ८) असा शो शनिवार पेठेतही झाला; तर शुक्रवारी दुपारी मालकाच्या एका हाकेत म्हैसमालकाजवळ पळत येणे, मोटारसायकलसोबत रेडकू व म्हैस पळविणे, म्हशीने देवाला नमस्कार करणे, म्हैस दोन पायांवर उभी राहणे, अशा एक ना अनेक थरारक कसरती या शोमध्ये सादर करण्यात आल्या.
गेले २५ वर्षांहून अधिक काळ असा शो अर्थात म्हैसपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही परंपरा आजही जिल्हा म्हैस व दुग्ध व्यावसायिकांनी जपली आहे. हा शो पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. गर्दीत अचानक फिरणाऱ्या म्हशी आणि बघ्यांची पळापळ अशा थरारात हा शो रंगला होता. यात म्हैस अंगावर येईल आणि कधी धडक बसेल याचा नेम नाही, असे वातावरण असूनही हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील (करंबेकर) यांनी स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते मानाचा नारळ देऊन म्हैसमालकांचा सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक काका पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब चिले, राजू पाटील, राजू भोसले, विजय चौगुले, हरिभाऊ पायमल, पिंटू भोसले, गोगा पसारे, रंगराव गाडगीळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
यांच्याकडे सर्वांचे लक्ष
रणजित गवळी यांच्या ‘जन्नती’च्या पाठीवर ‘मराठा आरक्षण देताय का इस्कटू?’ व दुसऱ्या बाजूला ‘आरक्षणातील शहिदांना आदरांजली,’ असे शब्द रंगविले होते. त्यामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ह ोते; तर सदाशिव गवळींच्या धष्टपुष्ट ‘पवन’नेही आपल्या आकर्षक रंगसंगती व थरारक प्रात्यक्षिकांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे बावरी, लक्ष्या, राणी, उडान, सरदार, राजा, पाडस, चांदी, चंदी, बाबू या म्हशींनी तर सर्वांचे मनोरंजन करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधले.