‘म्हासुर्ली’ बाजारात दिसली जागा की थाटले दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:44+5:302021-03-01T04:26:44+5:30
महेश आठल्ये लोकमत न्यजू नेटवर्क म्हासुर्ली : राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यांतील नागरिकांसाठी सोयीचा असलेल्या म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील ...
महेश आठल्ये
लोकमत न्यजू नेटवर्क
म्हासुर्ली : राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यांतील नागरिकांसाठी सोयीचा असलेल्या म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील आठवडी बाजार दिवसेंदिवस समस्यांचे केंद्र बनत आहे. रस्त्यावर दिसली जागा की थाटले दुकान, या प्रवृत्तीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गर्दीचा गुंता वाढत आहे.
धामणी खोऱ्यातील सुमारे पन्नास-साठ वाड्यावस्त्यांसाठी सोयीचा म्हासुर्ली आठवडी बाजार गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून दर रविवारी मंदिरासमोरील चौकात भरत आहे. म्हासुर्ली- कळे आणि म्हासुर्ली- गगनबावडा या दोन मुख्य रस्त्यांवरच हा बाजार भरत असल्याने वाहतुकीच्या कोंडी ठरलेली असते; परंतु सध्या व्यापाऱ्यांची वाढलेली संख्या, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनांतून शेतमाल घेऊन येऊन थेट रस्त्यावर बसून विकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या बाजाराची जागा कमी पडत आहे. व्यापाऱ्यांना रस्त्यावर दुकाने मांडण्याशिवाय पर्याय राहिला नसून, ग्राहकांना बाजारात खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरीस सामोरे जावे लागते. त्यात कळे, गगनबावडाकडे जाणारी वाहने येथून जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. यामुळेच ग्रामपंचायत प्रशासनाने आतापर्यंत बऱ्याच वेळेस बाजारात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी नवीन येणाऱ्या व्यापाऱ्यांनी जागा मिळेल तिथे दुकान मांडणे सुरू केल्याने ही शिस्त मोडली आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केली, तर बेशिस्तपणास अंकुश लागणार आहे.
(समाप्त)
ही आहे पर्यायी व्यवस्था
मुख्य रस्त्यावर दुकान मांडणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्य बाजारपेठेत कायमस्वरूपी जागा देण्याबरोबरच बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत प्रशासनाने वाहन पार्किंगची व्यवस्था करणे. आणखी एक बाजाराच्या दिवशी वाहतूक वळवण्याचा पर्यायही होऊ शकतो.
कोट -
ग्रामपंचायत प्रशासन वेळोवेळी व्यापाऱ्यांसह वाहनधारकांनाही शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. मात्र, प्रत्येक वेळी येणारे नवीन ग्राहक आणि व्यापारी यांच्यामुळे शिस्त मोडली जाते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-विराज गणबावले (ग्रामविकास अधिकारी, म्हासुर्ली)
फोटो ओळी :
म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील आठवडी बाजारात ट्रॅक्टर थेट रस्त्यावर लावूनच शेतीमालाची विक्री केली जाते. (फोटो-२८०२२०२१- कोल-म्हासुर्ली)