‘मायक्रो फायनान्स’चा विळखा

By admin | Published: December 26, 2016 09:50 PM2016-12-26T21:50:28+5:302016-12-26T21:50:28+5:30

शाहूवाडी तालुका : कर्ज वसुलीसाठी बचतगटांच्या महिलांकडे तगादा

'Micro Finance' check | ‘मायक्रो फायनान्स’चा विळखा

‘मायक्रो फायनान्स’चा विळखा

Next

शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटांना घरगुती व छोट्या व्यवसायांसाठी कर्जपुरवठा केलेला असून, कर्ज वसुलीसाठी बचतगटांच्या महिलांना जेरीस आणले जात आहे.
शित्तूर-वारुण, खेडे परिसरातील गावांसह वाड्या-वस्त्यांवरील अनेक महिला बचतगटांनी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची वसुली पंधरवड्यातून एकदा ठरलेल्या दिवशी केली जाते. कर्ज वसुलीच्या दिवशी एखाद्या महिलेकडे पैसे नसतील तर बाकीच्या सर्व महिलांना पैसे मिळेपर्यंत त्याच ठिकाणी बसवून वेठीस धरले जाते. जमत नसेल तर उरलेली सर्व रक्कम एक साथ भरा आणि मोकळे व्हा, अशा प्रकारे वसुली अधिकाऱ्यांकडून बोलले जाते. पैशाऐवजी चेकचा स्वीकार केला जात नाही, अशा विविध कारणांमुळे महिला बचतगटांतील महिलांचे आर्थिक शोषण होत असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नोटाबंदीमुळे अडचणीत आलेल्या सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. नोटाबंदीपूर्वी दूध उत्पादकांना दहा दिवसांनी बिल मिळायचे. शेतकरी, शेतमजुरांच्या हातात दैनंदिन व्यवहाराइतका खेळता पैसा असायचा; परंतु नोटाबंदी आणि सध्याच्या चलन तुटवड्यामुळे सामान्य माणसांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याने बचतगट मेटाकुटीस आलेले आहेत.


महिला बचतगटाच्या सदस्य मनीषा नांगरे म्हणाल्या, सध्या वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा हप्ता मासिक करण्यात यावा. नोटाबंदी आणि चलन तुटवड्यामुळे सध्याची वसुली स्थगित करून चलन व्यवहार सुरळीत झाल्यानंतरच कर्ज वसुलीस सुरुवात करावी. रोख रक्कम नसेल अशावेळी फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी चेक स्वीकारून बचतगटांना सहकार्य करावे.
यावेळी बोलताना महिला बचत गटाच्या सदस्य नंदाताई कांबळे म्हणाल्या, फायनान्स कंपनीकडून महिला बचतगटातील महिलांचे होत असलेले आर्थिक शोषण व पिळवणूक थांबवावी. फायनान्स कंपनीच्या जाचक अटी शिथील करण्यात याव्यात.

Web Title: 'Micro Finance' check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.