आजऱ्यातून ‘मायक्रो फायनान्स’ गाशा गुंडाळणार
By admin | Published: April 16, 2015 11:48 PM2015-04-16T23:48:42+5:302015-04-17T00:03:49+5:30
ठेवीदारांचे धाबे दणाणले : शाखा व्यवस्थापक ताब्यात
आजरा : आजरा तालुक्यातील दोन हजार ठेवीदारांच्या सुमारे नऊ कोटी रुपयांच्या ठेवींना चुना लावून भुवनेश्वर-ओरिसा येथील मायक्रो फायनान्स कंपनी आजरा तालुक्यातून बोजा गुंडाळण्याच्या स्थितीत असून, आजरा येथील शाखा व्यवस्थापक त्रिलोचन इथिली याला सोलापूर पोलिसांनी सोलापुरातील ठेवीदारांना पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याने आजरा शाखेतील ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. सुमारे १५ वर्षांपासून आजरा येथे मायक्रो फायनान्स या ओरिसा येथील फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. व्यवस्थापक वगळता सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट हे स्थानिक आहेत. जुलै महिन्यात या कंपनीस रिझर्व्ह बँकेने ठेवी गोळा करण्यास बंदी घातली. याची ठेवीदारांना फारशी कल्पना नसल्याने ठेवीदार अनभिज्ञ होते. या बातमीची कुणकुण लागलेल्या ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत आपापल्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती.
ठेवीदारांनी आजरा बाजारपेठेतील शाखा कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर कार्यालयातील उपस्थित उदय पांडव, सौ. देसाई यांच्याकडून २७ एप्रिलनंतर सर्वांचे पैसे देण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)
एजंट धारेवर
बहुतांशी ठेवीदार एजंटांना दोष देताना दिसत होते. एजंटांनी गोड बोलून भरघोस कमिशनसाठी भरमसाट खाती काढली आहेत. दीर्घ मुदतीच्या ठेवींसह पिग्मी व रिकरिंग ठेवीदार एजंटांना ठेवी परत मिळविण्यासाठी धारेवर धरत आहेत.
अनेकजण अडकले
आजरा तालुक्यातील सुमारे दोन हजार ठेवीदारांचे नऊ कोटी रुपये ठेवी स्वरूपात मायक्रोे फायनान्सने जमा केले आहेत. यामध्ये फेरीवाल्यांपासून ते बड्या व्यापाऱ्यांचाही समावेश आहे.