स्थलांतरित पूरग्रस्तांना अनुदानाची प्रतीक्षाच -महिना उलटूनही हाती ठेंगाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:45+5:302021-09-02T04:52:45+5:30
उदगाव : महापूर येऊन महिना उलटला तरी स्थलांतरित पूरग्रस्तांना अजूनही ना धान्य मिळाले आहे, ना सानुग्रह अनुदान. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये ...
उदगाव : महापूर येऊन महिना उलटला तरी स्थलांतरित पूरग्रस्तांना अजूनही ना धान्य मिळाले आहे, ना सानुग्रह अनुदान. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी व स्थलांतरित यांच्यात वारंवार तंटे होत आहेत. त्यामुळे तातडीने स्थलांतरितांना योग्य निर्णय घेऊन सानुग्रह अनुदान व धान्य मिळावे, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावे करीत आहेत.
गेल्या महिन्यात महापुराने शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये प्रापंचिक साहित्य, अन्नधान्य, पशुखाद्य व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेच्या रेट्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने पंचनामे जरी पूर्ण केले असलेतरी जे पूरग्रस्त स्थलांतरित झाले होते, त्यांच्यासाठी झालेले निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी दिसून येत नाही. पूरग्रस्तांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली आहेत. तरीही त्यांना न्याय मिळताना दिसत नाही. एक महिना उलटूनही मदत मिळत नसेल तर असली मदत हवीच कशाला, असा सूर स्थलांतरित पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहे.
.......
कोट - ग्रामपंचायतीमध्ये आम्ही वारंवार पूरग्रस्त व स्थलांतरित यांच्यासंदर्भात अनुदान कधी जमा होणार यासंदर्भात विचारणा करीत आहोत. परंतु आज होईल उद्या होईल, या आशेने पूरग्रस्त बसले आहेत. स्थलांतरिताचा शासन निर्णय होऊनसुद्धा त्यांच्यावर अन्याय होत आहे.
- विजयकुमार ठोमके, पूरग्रस्त, उदगाव