लक्ष्मीपुरी धान्य मार्केटचे स्थलांतर करणार
By Admin | Published: February 19, 2016 12:25 AM2016-02-19T00:25:44+5:302016-02-19T00:28:30+5:30
स्थायी समिती सभेत प्रशासनाची माहिती : वाहतूक कोंडीवर तोडगा; लवकरच अंतिम सुनावणी घेऊन प्रक्रिया राबविणार
कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लक्ष्मीपुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे तेथील धान्य बाजार तातडीने मार्केट यार्ड परिसरात हलविण्यात यावा, अशी आग्रही मागणी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली. यावर प्रशासनानेही लवकरच सर्व धान्य व्यापाऱ्यांचे स्थलांतर करण्यात येईल, असे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते.
लक्ष्मीपुरीत धान्याची पोती घेऊन अवजड वाहने मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांच्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी घालावी. लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारासाठी महापालिकेने जागा दिली आहे. व्यापाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन तातडीने स्थलांतरित करावे. सन १९७४ मध्ये व्यापाऱ्यांशी झालेल्या कराराची मुदत संपलेली आहे. त्यांना नोटिसा दिल्या होत्या, त्याचे काय झाले, अशी विचारणा सूरमंजिरी लाटकर व नीलोफर आजरेकर यांनी केली.
महानगरपालिकेने मार्केट यार्डमध्ये ले-आऊटला मंजुरी देऊन रस्ते, गटर्स केली आहेत. उर्वरित सुविधा बाजार समितीने द्यावयाच्या आहेत. व्यापाऱ्यांना स्थलांतराबाबत नोटिसा दिलेल्या आहेत. अंतिम सुनावणी घेऊन त्यांना स्थलांतर केले जाईल. वाहतूक कोंडीबाबत व्यापारी व वाहतूक पोलिसांची बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
शहरात मुख्य मार्गावर वाहने वाढल्यामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन केले पाहिजे. दिशादर्शक व मार्गदर्शक बोर्ड कमी आहेत. स्पीडब्रेकर कमी आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवरील शाळा सुटण्याच्या वेळा वेगवेगळया ठेवण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचनाही लाटकर यांनी केली.
त्यावेळी वाहतूक नियोजनासाठी दक्षता समिती बैठकीत सम-विषय पार्किंग, स्पीड ब्रेकर याबाबतचे
निर्णय घेतले जातात. शाळा सुटण्याच्या वेळा बदलण्याबाबत बैठक घेतल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
महापालिकेची अनेक काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबतात. त्यांचे वेळेत निकाल लागत
नाहीत. सर्वांनी मिळून महापालिकेच्या केसेससाठी स्पेशल कोर्ट नेमण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गैरहजर राहणाऱ्या वकिलावर
कारवाई करून त्यांना पॅनेलवरून काढून टाकावे, अशी सूचनाही लाटकर यांनी केली. त्यावेळी स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद असली तरी
यासाठी महापालिकेला सर्व खर्च करावा लागणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी विविध विषयांवरील चर्चेत नीलेश देसाई, अजित ठाणेकर, सुनील पाटील, रूपाराणी निकम, जयश्री चव्हाण, सत्यजित कदम, मनीषा कुंभार, उमा इंगळे आदींनी भाग घेतला.
तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणचे काय?
तावडे हॉटेल येथील अतिक्रमण विरोधी मोहिमेचे काय झाले? दोन वर्षे झाले कोर्ट केस सुरू आहे तरी बोर्डावर तारीख येत नाही. ‘जैसे थे’ परिस्थिती असताना बांधकामे सुरू आहेत. नव्या बांधकामावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी जयश्री चव्हाण यांनी केली. यावर कंटेम्ट आॅफ कोर्ट झाले असून सुनावणीची तारीख मिळालेली नाही त्यामुळे कारवाई थांबल्याचे प्रशासनाने सांगितले.