करवीर तालुक्यातील सात हजार कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:26+5:302021-07-24T04:16:26+5:30
वाहतूक, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यात गेल्या २४ तासांत झालेल्या उच्चांकी पावसाने ८० ...
वाहतूक, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर तालुक्यात गेल्या २४ तासांत झालेल्या उच्चांकी पावसाने ८० गावे प्रभावित झाली आहेत. अनेक गावांतील नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरल्याने जवळपास सात हजार कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे. महापुराने रस्ते वाहतूक, वीज, पिण्याचे पाणी प्रभावित झाले आहे.
करवीर तालुक्यांत गेल्या २४ तासांत ३३१ मिलिमीटर उच्चांकी पावसाची नोंद झाला आहे. सरासरी पावसाच्या आकडेवारीतही २०२० च्या तुलनेत यावर्षी आजअखेर ५५७ मिलिमीटर जास्त पाऊस झाल्याने मुसळधार पावसाची तीव्रता समोर येत आहे.
करवीरच्या पश्चिमेला असणाऱ्या ३० गावांचा संपूर्ण संपर्क तुटला आहे. अनेक गावांतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. जवळपास ८० गावांतील पाच हजारांवर कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. चिखली आंबेवाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, हणमंतवाडी, वरणगे, पाडळी गावात गंभीर परिस्थिती आहे. सहा-सात गावांतील दोन अडीच हजार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर -रत्नागिरी, कोल्हापूर - राधानगरी या महामार्गासह वहातुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
चौकट १) दूध उत्पादकांना मोठा फटका - करवीर तालुक्यातून गोकुळ व इतर दूधसंघांना साडेचार लाख लिटर दूध पुरवठा केला जातो. पण आज सर्वच मार्गावर पाणी आल्याने वहातूक बंद झाल्याने दूध संकलन बंद झाले आहे. यामुळे दूध उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. याशिवाय नदीकाठच्या ऊस पिकाचे महापुरामुळे मोठे नुकसान होणार आहे
फोटो 1) वाकरे (ता. करवीर) येथे नागरी वस्तीत पाणी शिरले 2) पुरामुळे जनावरांसह स्थलांतरित होताना चिखली येथील ग्रामस्थ.