करवीर तालुक्यातील सात हजार कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:43+5:302021-07-26T04:23:43+5:30
वाहतूक, पिण्याचे पाणी, वीज विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : गेला आठवडाभर झालेल्या उच्चांकी पावसाने करवीर तालुक्यातील ८० ...
वाहतूक, पिण्याचे पाणी, वीज विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : गेला आठवडाभर झालेल्या उच्चांकी पावसाने करवीर तालुक्यातील ८० गावे प्रभावित झाली आहेत. या गावांमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने जवळपास सात हजार कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे. महापुराने रस्ते वाहतूक, वीज, पिण्याचे पाणी प्रभावित झाले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने महापुराचे पाणी ओसरण्यास आणखी आठवडा लागणार आहे
करवीर तालुक्यातील पाचही नद्यांनी मुसळधार पावसानंतर धोका पातळी ओलांंडली. प्रथम पश्चिमेला असणाऱ्या गावांना जोडणारे अनेक मार्ग नद्या व ओढ्यांवर आलेल्या पाण्याने बंद झाले. यामुळे ३० ते ३५ गावांशी संपर्क पूर्णतः तुटला होता. महापुराने करवीरच्या पूर्वेकडील चिखली, आंबेवाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, हणमंतवाडी, वरणगे, पाडळी या गावांंना बेटाचे स्वरूप आले आहे.
दूध उत्पादकांना मोठा फटका
करवीर तालुक्यातून गोकुळ व इतर दूध संघांना साडेचार लाख लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. पण सर्वच मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे गेले चार दिवस दूध संकलन बंद आहे. यामुळे दूध उत्पादकांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसणार आहे. याशिवाय नदीकाठच्या ऊस पिकाचे महापुरामुळे मोठे नुकसान होणार आहे.
फोटो -- शिंगणापूर (ता. करवीर) येथे पूरग्रस्त कुटुंब व जनावरांना स्थलांतरित केले आहे.