मिलिंद सोमण ‘डबल आयर्नमॅन’साठी सज्ज-कोल्हापूर परिसराला पसंती : सायकलिंग, पोहणे, धावणे असा २१ तास केला सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:12 AM2018-06-08T00:12:30+5:302018-06-08T00:12:30+5:30
परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाºया डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन
सचिन भोसले ।
कोल्हापूर : परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्या डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला.
मिलिंद सोमण याचे काल (बुधवारी) दुपारी १ वाजता आगमन झाले.
तत्काळ दोन वाजता मिलिंदने आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील तलावात चार तास पोहण्याचा सराव केला. त्यानंतर सहा वाजता कोल्हापूर ते बागलकोट (कर्नाटक) पुन्हा कोल्हापूर येथंपर्यंतच्या सायकलिंग प्रवासासाठी सुरुवात केली. त्यात त्याने सलग सात तासांत ३६० किलोमीटर सायकलिंग केले. त्याची ही सायकलिंग सफर गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली. त्यानंतर तत्काळ काही मिनिटांचा ब्रेक घेऊन त्याने पुन्हा ८० किलोमीटर धावण्यास प्रारंभ केला. हे त्याने धावणे सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर त्याने पुन्हा मुंबईकडे प्रयाण केले. त्याच्यासोबत पत्नी अंकिता व आई उषा सोमण याही त्याच्याबरोबर पायलटिंग करत आहेत.
त्यात विशेष म्हणजे पत्नी अंंकिता हिनेही त्याच्याबरोबर सायकलिंग, धावणे, पोहणे याचा सराव केला.
त्याच्या मदतीसाठी कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, उदय पाटील, वैभव बेळगांवकर, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. सूरज बागवान, आदित्य शिंदे, बलराज पाटील, नीलय मुधाळे, वरद पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे, सुप्रिया निंबाळकर, यश चव्हाण, अशिष तंबाके, रजनीकांत पाटील, अमर धामणे यांनी गेले दोन दिवस सहकार्य केले. त्यातील अनेकांनी त्याला दोन तासाहून अधिक धावणे, सायकलिंग, पोहण्यासाठी साथ दिली.
स्कॉटलंड येथे दि. ४ नोव्हेंबर १९६५ ला जन्मलेला मिलिंद काही वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर भारतात परतला. इलेक्ट्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या मिलिंदने सन १९८४-८५ मध्ये महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. ३० दिवसांत १५०० कि.मी. धावण्याचा लिम्का विक्रमही त्याच्या नावावर आहे. यासह २०१५ मध्ये आयर्न मॅन किताब पटकाविताना त्याने ३.८ कि.मी. पोहणे, १८०.२ कि.मी. सायकलिंग, ४२.२ कि.मी. धावणे अशी १५ तास १९ मिनिटांची न थांबता नोंद केली आहे.
कोल्हापूरचे वातावरण परदेशातील वातावरणासारखे थंड, गरम असे आहे. सरावाकरिता हे पोषक वातावरण असल्याने मिलिंदने दोन दिवसांचा सराव याठिकाणी केला.
- उषा सोमण , मिलिंद सोमणच्या आई