सैन्य भरतीस प्रारंभ; कोकणासह गोवा राज्यातील उमेदवारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:35 PM2018-12-06T14:35:14+5:302018-12-06T14:37:45+5:30
भारतीय सैन्यभरती विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आज, गुरुवारी मध्यरात्री पासून सैन्य भरतीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसाठी व गोव्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली.
कोल्हापूर : भारतीय सैन्यभरती विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आज, गुरुवारी मध्यरात्री पासून सैन्य भरतीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसाठी व गोव्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली.
भारतीय सैन्य भरती विभागाच्यावतीने कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्हयासह उत्तर आणि दक्षिण गोवा राज्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत सैन्यभरती होणार आहे. सैन्यभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसह गोव्या राज्यातील उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
मध्यरात्री बारा वाजल्या पासून सायबर चौक जवळील विद्यापीठाच्या प्रवेशद्वार येथून उमेदवारांना प्रवेशपत्र पाहून आत सोडण्यात येत होते. त्यानंतर धावणे चाचणी घेण्यात आली. यामधून निवड झालेल्या उमेदवारांची लांब उडी, पाच हजार उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होतील.
या ठिकाणी त्यांचे धावणे, मैदानी चाचणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यांमध्ये निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांची बायोमॅट्रिक घेवून पुढील फेरीसाठी पाठविण्यात येत होते. अपात्र झालेल्या उमेदवारांना एन.सी.भवन येथून बाहेर सोडण्यात येत होते. सायबर चौक, सम्राटनगर परिसरात उमेदवारांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्र
पहिल्या टप्प्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी साधारणपणे एक हजार उमेदवारांनी या मोफत अन्नछत्रांचा लाभ घेतला.
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी, नातेवाई व मित्र मंडळीनी सायबर चौक, सम्राट नगर याठिकाणी थांबून, वाहतूक अडथळा न करता राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावरील फ्रि मार्शलिंग एरियामध्ये सर्वांची थांबण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. येथून या उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी पाठविले जाणार आहे. तरी सर्व उमेदवार,नातेवाईक व मित्रपरिवारांनी सहकार्य करावे.
मेजर सुभाष सासणे,
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी