तुळशी-धामणीत खोऱ्यात दुध आंदोलक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:58 PM2020-07-21T12:58:07+5:302020-07-21T13:05:36+5:30
दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लिटर दुध तुळशी नदीत ओतले व या आंदोलनासा पाठींबा दिला.
धामोड : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लिटर दुध तुळशी नदीत ओतले व या आंदोलनासा पाठींबा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस संपूर्ण भागात फिरून दुध संकलन करू नये, तसेच आपण दुध अनुदानासाठी पुकारलेल्या एक दिवशीय लाक्षनिक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. पण काल रात्री उशिरा गोकुळ दुध संघाने दुध संकलनाचा निर्णय घेतला व सुपरवायझरकरवी दुध संकलनाची यंत्रणा उभी केली. ठरल्याप्रमाणे गोकुळ दुध संघाच्या दुध संस्थांनी संकलन करून टेंपोतून पाठवले.
ही बातमी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याना सकाळी समजताच युवा आघाडीच्या कार्यकर्त्यानी आपल्या मोर्चा तुळशी नदीकडे वळवला. या ठिकाणी दुधाचे टेंपो अडवले व टेंपोतील दुधाने भरलेली सर्व कॅन तुळशी नदीपात्रात रिकामी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा धसका माहित असल्याने कांही दुध संस्थांनी आज सकाळचे दुध संकलन गोकुळ कडून आदेश येऊनही थांबवल्याने त्यांचा फायदा शेतकऱ्यांनाच झाला.
ज्यादा दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील दुध गोरगरीबांना वाटले. स्वाभिमानी युवा आघाडीने दुध अनुदानासाठी पुकारलेल्या या आंदोलनात तुळशी-धामणी युवा आघाडीचे अध्यक्ष कुमार कुरणे, आर. डी. कुरणे, महादेव पाटील, बापूसो जाधव, अमित कोरे, रोहित खोत, भरत जाधव, स्वप्नील कुरणे, राहूल पाटील आदींसह युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते .