पाण्यापेक्षा दूध झाले स्वस्त; उत्पादकांचे कंबरडे मोडले : दूधदर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:48 AM2018-06-21T00:48:43+5:302018-06-21T00:48:43+5:30

Milk becomes cheaper than water; Producers broke down: milk prices question | पाण्यापेक्षा दूध झाले स्वस्त; उत्पादकांचे कंबरडे मोडले : दूधदर प्रश्न

पाण्यापेक्षा दूध झाले स्वस्त; उत्पादकांचे कंबरडे मोडले : दूधदर प्रश्न

Next
ठळक मुद्दे‘गोकुळ’च्या निर्णयावर कमालीचा संताप; उत्पादन खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादनखर्च पाहता आता हातात जनावरांचे शेणही राहणार नाही. पाण्याची बाटली वीस रुपये आणि दूध अठरा रुपयांनी विकायची वेळ आल्याने शेतकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनाची आकडेवारी पाहिली तर पूर्वी म्हैसवर्गीय जनावरांची संख्या अधिक होती पण अलीकडील दहा-पंधरा वर्षांत गायींची संख्या कमालीची वाढलेली दिसते. शेती व्यवसाय आतबट्ट्यात आल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळले. सुरुवातीच्या टप्प्यात म्हशीच्या दुधाला गायीच्या तुलनेत चांगला दर होता, त्यामुळे तुलनेने गायीचे दूध कमी होते. दुधाची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत होत गेल्यानंतर सर्वच दूध संघांनी दूध संकलन वाढीवर भर दिला.

म्हशीबरोबर गायीचे दूधवाढीसाठी विविध प्रोत्साहनपर कार्यक्रम हाती घेतल्याने दुधात झपाट्याने वाढ झाली; पण म्हशीच्या किंमती आणि तिचा भाकड काळामुळे शेतकरी तुलनेने कमी भाकड काळ असणाºया गायीकडे वळला. ‘गोकुळ’सारख्या दूध संघाने तर ‘वासरू संगोपन’ योजना राबवून जातिवंत दुभती जनावरे शेतकºयांच्या गोठ्यातच तयार करण्यास सुरुवात केली. या योजनेमुळे दुभत्या जनावरांची संख्या कमालीची वाढली, परिणामी दूधही वाढले. यामध्ये गाय दुधाने म्हशीशी बरोबरी केली. गाय दुधाची विक्री कमी होत असली तर उपपदार्थ व पावडरसाठी वापर केला जात असल्याने दूध संघानेही चांगला दर देण्यास सुरुवात केली; पण अलीकडे पावडरचे दर पडल्याने गायीचे दूध अतिरिक्त होऊ लागले. त्यामुळे दूध संघांनी दर कमी करण्याचा सपाटा लावला.

‘गोकुळ’ने दोनवेळा गाय दूध खरेदी दरात कपात केल्याने उत्पादक सैरभैर झाले आहेत. एकाबाजूला वाढत्या महागाईने दुधाचा उत्पादनखर्च वाढत असताना दुसºया बाजूला दर मात्र कमी होत असल्याने हा व्यवसाय शेतकºयांच्या हाताबाहेर गेला आहे. ‘गोकुळ’ने आजपासून कार्यक्षेत्रातील दूध २३ रुपये तर कार्यक्षेत्राबाहेर दूध १८ रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकºयांचे पुरते कंबरडे मोडणार आहे. महागलेले पशुखाद्य, वाळलेल्या वैरण व पशुवैद्यकीय सेवेने गाय दूध उत्पादक आता कमालीचा संकटात सापडणार आहे. बाजारात कंपन्यांची पाण्याची एक लिटरची बाटली वीस रुपयाला मिळते आणि दूध अठरा रुपयांनी विकायची वेळ शेतकºयांवर आली आहे.

खरेदी-विक्रीत २४ रुपयांची तफावत
‘गोकुळ’ कार्यक्षेत्रातील दूध २३ रुपयांनी तर बाहेरील दूध १८ रुपयांनी खरेदी करणार आहे; पण त्याची विक्री ४२ रुपयांनी करणार आहे. प्रतिलिटर १९ ते २४ रुपयांची तफावत आहे. खरेदीपेक्षा दुप्पट दराने विक्री करून संघ तोट्यात कसा? असा सवाल उत्पादक करत आहेत.
 

गायी विका म्हणून तरी सांगा!
‘गोकुळ’ला ज्यावेळी दुधाची गरज होती, त्यावेळी आम्हाला गायी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता ‘अतिरिक्त दुधा’च्या नावाखाली सहा महिन्यांत चार रुपयांनी दर कमी करून शेतकºयांचा विश्वासघात केला. तुम्हाला दूधच नको असेल तर थेट गायी विका म्हणून तरी सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया उत्पादकांमधून व्यक्त होत आहेत.


हा घ्या उत्पादकाचा एका लिटरचा ताळेबंद

पशुवैद्यकीय विभागानुसार पशुखाद्य (अर्धा किलो शरीर पोषण + ३०० ग्रॅम दुधासाठी)- १५.३६ रुपये
ओली वैरण (४ किलो)- १२ रुपये
वाळलेली वैरण (१ किलो)- ९ रुपये
एकूण खर्च- ३६.३६ रुपये
१ लिटर दुधाची किंमत- २३ रुपये (कार्यक्षेत्रात) १८ रुपये (कार्यक्षेत्राबाहेर)
तोटा- १३.३६ रुपये (शेतकºयाची राबणूक सोडून)
दृष्टिक्षेपात राज्यातील गाईचे दूध
खासगी सुरू असलेले दूध संघ : २०
सहकारी दूध संघ : ८६
प्रतिदिन उत्पादन : २ कोटी ८० लाख लिटर
त्यांपैकी ८० टक्के दूध हे गाईचे
सरासरी विक्री दर :
४० रुपये
सरासरी खरेदी दर :
१९ रुपये

Web Title: Milk becomes cheaper than water; Producers broke down: milk prices question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.