दूध पावडरची ३४० रुपयांवर उसळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:40 AM2020-02-10T05:40:05+5:302020-02-10T05:40:17+5:30
आतापर्यंतचा सर्वाधिक दर : वर्षात किलोमागे १६५ रुपयांची वाढ
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने मागणी आणि पुरवठ्यात तफावत वाढल्याने दूध पावडरच्या दराने उसळी घेतली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सध्या ३४० रुपये किलोचा दर असून, वर्षभरात किलोमागे तब्बल १६५ रुपयांची वाढ झाली आहे. त्या तुलनेत बटरचे दर प्रतिकिलो ९० रुपये वाढले आहेत.
दूध उत्पादन कमी होण्याला महापुराचे कारण पश्चिम महाराष्टÑापुरते असले तरी संपूर्ण देशातच दूध उत्पादन कमी झाले आहे. दुधाचे बिल आणि पशुखाद्याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी या व्यवसायापासून दूर जात आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रतिकिलो २७५ रुपये दर होता, तो नोव्हेंबरमध्ये २८५ रुपयांपर्यंत पोहोचला. आता दर ३४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने दूध कमी पडल्याने न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियातून पावडर आयात केली. गरजेपेक्षा अधिक पावडर आल्याने दुधाचे दर कोसळले. आताही पावडर आयात करण्याच्या हालचाली सुरू असल्याने दुधाच्या दरात पुन्हा घसरण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
दूध पावडर निर्मिती प्रकल्प
एकूण २१ प्रकल्प :
५४४ टन प्रतिदिनी.
शासकीय - ४ (क्षमता ५१ टन)
सहकारी - ५ (क्षमता १५२ टन)
खासगी - १२ ( क्षमता ३४१ टन)