पशुखाद्याच्या दरवाढीने दूध उत्पादक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:11+5:302021-04-29T04:18:11+5:30
शरद यादव कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी हजार रुपयांना पोते असा दर असलेली सरकी पेंड १३७० वर पोहचल्याने तसेच गहू ...
शरद यादव
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी हजार रुपयांना पोते असा दर असलेली सरकी पेंड १३७० वर पोहचल्याने तसेच गहू भुश्शाचा दरही पोत्यामागे ३०० रुपयांनी वाढल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकाचा हातातील घास तोंडात पडणे मुश्कील झाले आहे. गेल्या ३ वर्षांत दुधाच्या दरात दमडीचीही वाढ झाली नसताना वीज, आरोग्यावरील खर्च, मजुरी याचा दर प्रतिवर्षी वाढतच हाेता. आता पशुखाद्यानेही दरवाढीची उसळी घेतल्याने जनावरे पाळण्यापेक्षा रोजगाराला गेलेले बरे, असा सूर शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. बारमाही पाणी तसेच उसामुळे ओल्या चाऱ्याची उपलब्धता, यामुळे हा व्यवसाय जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन बनला आहे. यामुळेच जिल्ह्यात दररोज २२ लाख लिटर दूध संकलन केले जाते. अनेक कुटुंबे तर पूर्णवेळ हाच व्यवसाय करतात. परंतु गेल्या ३ महिन्यांत सरकी पेंड तसेच गहू भुस्सा याचे दर पोत्यामागे ३०० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. सरकी पेंड तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांचा तुटवडा तसेच इंधन दरवाढीने वाहतूक महागल्याने दराने उच्चांक गाठल्याचे सांगितले जात आहे. परंतु गेल्या ३ वर्षांत दूधदर मात्र एक रुपयानेही वाढलेला नाही.
उत्पादकाला गाईच्या दुधाला प्रतिलिटर सरासरी २४ ते २५ रुपये तर म्हैशीच्या दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये दर मिळतो. यातून खर्च वजा केला तर ‘धन्याचे पाेट गड्याला’ असा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. पशुखाद्याचे दर वाढणार असतील तर गाईचे दूध ३५ ते ४० रुपये व म्हशीचे दूध प्रतिलिटर ५५ ते ६० रुपये करा, अशी आग्रही मागणी दूध उत्पादक शेतकरी करू लागला आहे.
......
दुधाचा उत्पादन खर्च
एक म्हैस दररोज दहा लिटर दूध देते, असे गृहीत धरले तर दिवसाला दोन वेळा ३ किलोप्रमाणे ६ किलो खाद्य घालावे लागते. याला १५० रुपये जातात. रोज ४० किलो वैरण लागते, यासाठी १२० रूपये, तसेच आजारपण, पाणी, वीज, मजूर यावर ५० रुपये खर्च होतात. तसेच रोज १ किलो मिनरल मिक्चर घालावे लागते. याची गोळाबेरीज करता जेमतेम ५० रुपये उत्पादकाला राहतात. परंतु म्हशीचा ८ महिन्याचा भाकड काळातील खर्चाचा विचार करता शेतकऱ्याच्या पदरात केवळ शेणच पडत असल्याचे वास्तव आहे.
.........
कोट....
पशुखाद्याच्या दरावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे दुधाचा व्यवसाय घाट्यात चालला आहे. उन्हाळ्यामुळे जनावरांचे दूध कमी झाले असताना तसेच कोरोनामुळे उपपदार्थांची मागणी घटली असताना पशुखाद्याची दरवाढ म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आल्यासारखे आहे. सरकारने याचा विचार करून दुधाचा दर ६० रुपये करावा.
सुनील चव्हाण, आळते, शेतकरी
.............
दुधाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना दूधदर मात्र ३ वर्षे ‘जैसे थे’ का आहे. उत्पादन खर्चाच्या पटीत दरही वाढला पाहिजे. यावर त्वरित निर्णय झाला नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याचा धाेका आहे. दिवसभर जनावराप्रमाणे राबायचे अन् तोट्यात धंदा करायचा, हे आम्ही किती दिवस सहन करायचे, याचा विचार व्हावा.
दिलीप मोरे, नवे पारगाव, शेतकरी
...........
दूध उत्पादक ७ लाख
दूध संकलन २२ लाख लिटर
सरकी पेंड दरवाढ प्रतिपोते ३००
गहू भुस्सा दरवाढ प्रतिपोते ३००