दूध; भुकटी अनुदानाचे राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:25 AM2018-07-09T00:25:40+5:302018-07-09T00:26:10+5:30

Milk; The subsidy for powdered grants has risen | दूध; भुकटी अनुदानाचे राजकारण पेटले

दूध; भुकटी अनुदानाचे राजकारण पेटले

Next

अशोक पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर (जि. सांगली) : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे यासाठी यल्गार पुकारला आहे, तर खा. शेट्टी यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी प्रयत्न चालवले आहेत. शेट्टींवर कडी करताना त्यांनी दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. यामुळे दूध उत्पादकांचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे ते चांगलेच संभ्रमात पडले आहेत.
राज्यात गोकुळ (कोल्हापूर), राजहंस (संगमनेर), वारणा (वारणानगर), सोनाई (इंदापूर), गोविंद आणि स्वराज्य (फलटण) हे दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन करतात. यापूर्वी राज्य शासनाने दूध भुकटीसाठी ५३ कोटींचे अनुदान दिले. परंतु त्याचा फायदा दूध उत्पादकांना झालाच नाही. याउलट दुधाचे दर २ रुपयांनी कमी झाले. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांना लिटरमागे ५ रुपयाचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. यासाठी १६ जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलनाचे हत्यारही त्यांनी उपसले आहे. काही खासगी भुकटी प्लँटधारकांनी मध्यंतरी पाशा पटेल यांच्या मध्यस्थीने दूध भुकटीसाठी अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु सहकारी दूध संघांकडे किती दूध भुकटी शिल्लक आहे, याचा कधीच शासनाने आढावा घेतला नाही. खासगी दूध संघ आणि भुकटी प्लँटधारकांनी कमी दरात दूध घेऊन मोठ्या प्रमाणात भुकटीचे उत्पादन केले आहे. त्यामुळेच काही मंत्र्यांना हाताशी धरुन भुकटीवरच अनुदान मिळविण्याचा डाव आखला आहे. परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच खा. शेट्टी यांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शासनाच्यावतीने मात्र भुकटी निर्यातीलाच अनुदान देऊन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे दूध उत्पादक संभ्रमात आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शेतकºयांची ताकद घेऊन शेट्टी पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. गत निवडणुकीत साखरसम्राटच शेट्टी यांच्या विरोधात होते. आता राज्यातील बहुतांशी साखरसम्राटांनी उसाला चांगला दर दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी नेत्यांपासून दुरावला आहे. त्यातच शेट्टी-खोत यांचे स्वार्थी राजकारण चव्हाट्यावर आले आहे. म्हणूनच खा. शेट्टी भाजपप्रणित महाआघाडीतून घुमजाव करून शेतकºयांच्या मेळ्यात डेरेदाखल झाले आहेत. आता त्यांचा लढा दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यासाठी सुरू आहे. तो मोडीत काढण्यासाठी राज्यातील एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री सरसावले आहेत.
‘हातकणंगले’चा उमेदवार कोण?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांच्याविरोधात कोण, याचे उत्तर भाजप आणि आघाडी काँग्रेसकडे सध्यातरी नाही. शेट्टींच्या विरोधात कृषी राज्यमंत्री खोत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. परंतु, खोत यांनी आपल्यावरील ओझे वारणा खोºयातील माजी मंत्री विनय कोरे यांच्या खांद्यावर टाकण्याची तयारी सुरू केली आहे.
केरळ, गोवा राज्य दुधाला लिटरमागे ८ रुपयांचे, तर कर्नाटक लिटरमागे ५ रुपये दूध उत्पादकांना अनुदान देते. आतापर्यंत शासनाने दूध भुकटीला ५३ कोटींचे अनुदान दिले आहे. तरीही दुधाचे दर २ रुपयांनी कमी झाले आहेत. आता सरकार पुन्हा काही दूध संघांना हाताशी धरुन दूध उत्पादकांची फसवणूक करीत आहेत. आमची मागणी थेट दूध उत्पादकांना अनुदान देण्याची आहे. यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार आहोत.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि दूध संघांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, अतिरिक्त झालेल्या व निर्माण होत असलेल्या दूध भुकटी निर्यातीवर प्रति किलो ५० रुपये व दुधास प्रति लिटर ५ रुपये निर्यात अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरु आहे. दूध उत्पादकांना न्याय मिळवून देणारच.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री.

Web Title: Milk; The subsidy for powdered grants has risen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.