‘अमूल’च्या विरोधात राज्यातील दूध संघांनी एकत्र यावे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 02:19 PM2023-05-30T14:19:28+5:302023-05-30T14:20:07+5:30
‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंत्री विखे-पाटील यांची घेतली भेट
कोल्हापूर : ‘अमूल’ दूध संघाचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघांनी एकत्र येण्याची गरज असून, कर्नाटक, तामिळनाडू सरकारने ‘अमूल’च्या विरोधात जशी भूमिका घेतली, तशीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी ‘महानंद’ने पुढाकार घ्यावा, राज्य सरकार ताकदीने मागे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंत्री विखे-पाटील यांची अहमदनगर येथे भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील दूध व्यवसाय आणि त्यापुढील आव्हाने याबाबत चर्चा झाली. दुधाचे उत्पादन वाढत, गुणवत्ता व मार्केटिंग आदी विविध विषयांवर भेटीत चर्चा झाली. यावेळी पी.टी. शिंदे, अजित पाचुंदकर आदी उपस्थित होते.
लवकरच ‘महानंद’ सोबत बैठक
राज्यातील दूध व्यवसायासमोरील अडचणी व ‘अमूल’चे आव्हान याबाबत लवकरच राज्यातील दूध संघ व ‘महानंद’ सोबत बैठक घेणार असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.