दूध, भाजीपाल्याला रोज ५० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:20 AM2021-04-26T04:20:11+5:302021-04-26T04:20:11+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध आणल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम ...

Milk, vegetables hit 50 lakhs daily | दूध, भाजीपाल्याला रोज ५० लाखांचा फटका

दूध, भाजीपाल्याला रोज ५० लाखांचा फटका

Next

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काेरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध आणल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. दूध, भाजीपाला व फळे ही अत्यावश्यक सेवा असली तरी त्याची विक्री घटली असून कोल्हापुरात रोज दूध व भाजीपाल्याला ५० लाखांचा फटका बसत आहे. त्याचा थेट परिणाम शेतकरी, व्यापाऱ्यांसह बाजार समित्यांवर झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागल्याने रुग्णांची संख्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध आणले असून त्यातून अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळाही कमी केल्या आहेत. दूध, भाजीपाला, फळे विक्रीही सकाळी ७ ते ११ या वेळेतच करावी लागत असल्याने त्याचा थेट परिणाम त्या व्यवसायावर झाला आहे. काेल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी २५०० क्विंटल भाजीपाला, ६५० क्विंटल फळांची आवक होते. मात्र, निर्बंध टाकल्यापासून आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. रोज सरासरी ७०० क्विंटल भाजीपाला तर १५० क्विंटल फळे कमी येत आहेत. त्यामुळे बाजार समितीची सुमारे ३० लाखांची उलाढाल घटली आहे. परिणामी समितीचे उत्पन्नही कमी झाले आहे.

हॉटेल, चहाच्या गाड्यांसह इतर खासगी व्यवसाय बंद असल्याने दुधाची मागणी कमी झाली आहे. ‘गोकुळ’ची रोज ८० हजार ते १ लाख लिटर दुधाची विक्री घटली आहे. दूध विक्रीतून मिळणारे सुमारे दहा लाखांचे उत्पन्न कमी झाले आहे. हे दूध संघाने पावडरकडे वळविले आहे. मात्र, पावडर तयार करण्याचा खर्च आणि त्याची विक्री होईपर्यंत ते भांडवल अडकून पडणार असल्याने संघाला तो फटकाच बसणार आहे. दूध व भाजीपाला, फळांच्या विक्रीवर परिणाम झाल्याने दोन्ही घटकांना रोज ५० लाखांचा फटका बसत आहे.

बाजारच नसल्याने भाजीपाला जनावरांना

कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी ते मे पर्यंत भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आताही आठवडी बाजार, मंडई बंद असल्याने भाजीपाल्याची विक्री करायची कोठे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. स्थानिक विक्री होत नसल्याने भाजीपाला जनावरांना घालण्याची वेळ आली आहे.

‘गोकुळ’ची बाहेरील दूध खरेदी कमी

उन्हाळ्यात दुधाची मागणी वाढत असल्याने ‘गोकुळ’ बाहेरून दूध खरेदी करते. मात्र, यावेळेला येथील दूधच अतिरिक्त होत असल्याने बाहेरील दूध खरेदी कमी झाली आहे.

बाजार समितीतील आवक क्विंटलमध्ये

तारीख फळे भाजीपाला

२१ एप्रिल २६५ १९७५

२२ एप्रिल ३८६ १७३३

२४ एप्रिल ११४५ २०००

२५ एप्रिल ४१० १०५०

Web Title: Milk, vegetables hit 50 lakhs daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.