सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मिल रोलर पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:56+5:302021-05-15T04:21:56+5:30
सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर, आठवा हंगाम घेण्याआधी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ...
सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर, आठवा हंगाम घेण्याआधी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रोलर पूजन करण्याची परंपरा या वर्षीही पाळत अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. यावेळी कारखाना ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दोन कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून दररोज २०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याची हंगामपूर्व कामे वेळेत करून यंदा नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील हंगामातील २९०० रुपये मेट्रिक टनांप्रमाणे संपूर्ण एफआरपी यापूर्वीच अदा केली आहे. तोडणी वाहतुकीची बिले पूर्ण दिली आहेत. पुढील हंगामाचे तोडणी वाहतूक ॲडव्हान्स, कमिशन व डिपॉझिटचे नियोजन पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत दिली जातील.
आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प दृष्टिक्षेपात आले असल्यामुळे पुढील हंगामामध्ये १० हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासद व हितचिंतक यांच्या आशीर्वादावर ही गरुडभरारी मारू शकलो, याचा सार्थ अभिमान आहे.
चौकट
अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, शरद पवार साहेबांनी साखर कारखानदारांना कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित करीत सर्वच कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. कारखान्याचे संस्थापक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना महामारीत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कारखान्याचा ऑक्सिजन प्लांट तत्काळ उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
१४ सेनापती कापशी
फोटो : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन करताना अध्यक्ष नविद मुश्रीफ. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
फोटो - संदीप तारळे