वृक्षारोपणातून कोट्यवधीची उधळपट्टी,भर उन्हाळ्यात कोल्हापूर महापालिकेचा ‘आदर्श उपक्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:59 AM2018-04-03T00:59:25+5:302018-04-03T00:59:25+5:30

एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम राबवित असताना दुसरीकडे हा कोट्यवधी रुपयांचा निधी कशा पद्धतीने खर्च केला जातो याचे विदारक सत्य कोल्हापूरमध्ये समोर आले आहे.

 Millennium extinction from plantation, Kolhapur Municipal Corporation's 'ideal venture' | वृक्षारोपणातून कोट्यवधीची उधळपट्टी,भर उन्हाळ्यात कोल्हापूर महापालिकेचा ‘आदर्श उपक्रम’

वृक्षारोपणातून कोट्यवधीची उधळपट्टी,भर उन्हाळ्यात कोल्हापूर महापालिकेचा ‘आदर्श उपक्रम’

Next
ठळक मुद्दे ‘अमृत’ योजना : २० गुंठ्यांत लावली तब्बल एक हजार झाडे;

एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम राबवित असताना दुसरीकडे हा कोट्यवधी रुपयांचा निधी कशा पद्धतीने खर्च केला जातो याचे विदारक सत्य कोल्हापूरमध्ये समोर आले आहे. अशास्त्रीय पद्धतीने लावलेल्या या झाडांबाबतच्या वस्तुस्थितीवर ‘लोकमत’ने टाकलेला प्रकाशझोत...

समीर देशपांडे ।

कोल्हापूर : शासनाच्या एखाद्या योजनेची वाट कशी लावली जाते याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या अमृत योजनेतील वृक्षारोपणाचे देता येईल. भर उन्हाळ्यात अशास्त्रीय पद्धतीने हे वृक्षारोपण सुरू असून, कोट्यवधी रुपयांचा निधी यावर खर्च केला जाणार आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत कोल्हापूर हरितक्षेत्र विकास या योजनेतून कोल्हापूर शहरामध्ये काही कामे सुरू आहेत. पुणे येथील निसर्ग लँडस्केप सर्व्हिसेस या कंपनीला कोल्हापूर शहरातील तीन कामांचे कंत्राट देण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांत या कंपनीचे मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरातील खणीशेजारी भर उन्हाळ्यात वृक्षारोपण सुरू आहे.

दोन फुटांचे अंतर न ठेवता आठ-दहा फुटांची उंच झाडे लावण्यात आली असून, याबाबत चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली आहे. गेल्यावर्षी या योजनेतून या कंपनीला साळोखेनगर, टेंबलाई मंदिर परिसर आणि बेलबागेतील हरित क्षेत्र विकासाचे काम  मिळाले. मात्र, ई टेंडर व अन्य प्रक्रिया होऊन जानेवारी २०१८ मध्ये या कंपनीला या जागांचा ताबा मिळाला.
त्यानंतर या कंपनीने निविदेत नमूद केल्यानुसार २ वर्षे झालेली, केंद्र सरकारच्या यादीतील, ७ / ८ फूट उंच वाढलेली झाडे हैदराबादवरून मागविली. सहा महिन्यांत काम संपवायचे असल्याने भरउन्हात खड्डे काढून हे वृक्षारोपणाचे काम सुरू करण्यात आले; परंतु केवळ कागदोपत्री असलेले निकष पूर्ण करण्यासाठी अशास्त्रीय पद्धतीने एक-एक फुटांवर खड्डे काढून ही मोठी होणारी झाडे लावण्यात आली आहेत.
जैव विविधता समितीचे
सदस्यही अनभिज्ञ

एकीकडे वृक्षारोपणासाठी केंद्राकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना महापालिकेच्या जैवविविधता समितीवर असलेले ख्यातनाम वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांना यातील काहीही माहिती देण्यात आली नाही. कुठे, कोणती झाडे लावावीत याचे मार्गदर्शन घेण्यासाठी बाहेरच्या राज्यातील संस्था आणि मंडळी त्यांचे मार्गदर्शन घेतात; परंतु कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एवढेही सौजन्य दाखविलेले नाही. मोठ्या झाडाखाली
लावली लहान झाडे

एका झाडाच्या सावलीखाली दुसरी झाडे वाढत नाहीत. ती उंच झाल्यानंतर काय होणार याचा विचार न करता टेंबलाई मंदिर परिसरात मोठ्या झाडांखाली लहान झाडे लावण्यात आली आहेत. या ठिकाणी साडेचार एकरांवर ६०७० झाडे लावण्यात आली आहेत. या ठिकाणी ड्रीप बसवून, बोअर मारून पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, या आणि मातीच्या पायवाटा करण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. येथेही जवळजवळ झाडे लावण्यात आली आहेत.

 

२० गुंठ्यांत १००० झाडे
बेलबागेत २७ गुंठे जागेमध्ये मातीच्या पायवाटेसाठी सात गुंठ्यांपेक्षा अधिक जागा सोडण्यात आली आहे. उर्वरित २० गुंठ्यात तब्बल १००० झाडे लावण्यात आली आहेत. एका-एका झाडामध्ये चारही बाजूला एक ते दीड फुटांचेही अंतर सोडण्यात आलेले नाही. वड-पिंपळाची प्रचंड मोठी होणारी झाडेही जवळजवळ लावण्यात आली आहेत. यासाठी २७ लाख रुपयांचा निधी अदा करण्यात येणार आहे.

साळोखेनगरातही हीच परिस्थिती
साळोखेनगरामध्ये दत्त मंदिर परिसरात ४० गुंठ्यात तब्बल १९०० झाडे लावण्याची कामगिरी करण्यात आली असून, यासाठी आणि तेथील मातीच्या रस्त्यांसाठी ४५ लाख रुपये अदा करण्यात येणार आहेत.

साळोखेनगरातही हीच परिस्थिती
साळोखेनगरामध्ये दत्त मंदिर परिसरात ४० गुंठ्यात तब्बल १९०० झाडे लावण्याची कामगिरी करण्यात आली असून, यासाठी आणि तेथील मातीच्या रस्त्यांसाठी ४५ लाख रुपये अदा करण्यात येणार आहेत.

कोल्हापूरमध्ये प्रचंड तापमान वाढले असताना ही वेळ झाडे लावण्याची नव्हे. ही झाडे जगण्यासाठी लावलीत की मरण्यासाठी ?
शास्त्रीयदृष्ट्या दोन झाडांमधील अंतर ८ ते १० फुटांचे आवश्यक असताना या ठिकाणी एक फूट चौरस अंतरामध्ये चार-चार झाडे लावण्यात आली आहेत.
झाड लावताना दीड बाय दीड फुटांचा खड्डा मारणे आवश्यक असताना वितभर खड्डे मारून झाडे लावली आहेत.
एकीकडे खड्डे लहान आणि दुसरीकडे आधाराला काठीही लावलेली नाही. ही झाडे टिकणार कशी ?
केवळ कागदोपत्री उद्दिष्टपूर्तीसाठी हे काम सुरू असून, अतिशय अशास्त्रीय पद्धतीने चाललेल्या या कामामुळे वेळ, श्रम आणि पैशांची नासाडी करण्याचे काम सुरू आहे.


डॉ. मधुकर बाचूळकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न
या वृक्षारोपणाबाबत माहिती मिळाल्यानंतर
डॉ. मधुकर बाचूळकर यांनी बेलबागच्या साईटला भेट दिली तेव्हा तेथील परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. हे सर्व पाहिल्यानंतर त्यांनी खालील प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे ही झाडे लावण्यात आली आहेत. झाडे लावल्यानंतर त्यातील ८० टक्के झाडे जगविणे बंधनकारक असून, एक वर्ष त्यांची देखभाल कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.
- जयकुमार पाटील, स्थानिक व्यवस्थापक, निसर्ग लॅण्डस्केप.


 

Web Title:  Millennium extinction from plantation, Kolhapur Municipal Corporation's 'ideal venture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.