महापालिकेत कोट्यवधीचा रस्ते घोटाळा

By admin | Published: June 1, 2017 12:28 AM2017-06-01T00:28:13+5:302017-06-01T00:28:13+5:30

अधिकारी व ठेकेदार यांचा संगनमताने डल्ला--साडेसहा कोटींची रस्त्याची कामे खराब,खराब ५६ रस्त्यांऐवजी १८ रस्त्यांचे ‘थर्ट पार्टी आॅडिट’

Millennium Roads Scam in Municipal Corporation | महापालिकेत कोट्यवधीचा रस्ते घोटाळा

महापालिकेत कोट्यवधीचा रस्ते घोटाळा

Next

१८ रस्त्यांत ७३ लाखांचे नुकसान; अहवालही लपविला---‘त्या’ अधिकारी ठेकेदारांवर फौजदारीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याचे आरोप वारंवार झाले, परंतु ते कधी उघड झाले नाहीत. मात्र, शहरातील खराब रस्त्यांच्या ‘थर्ड पार्टी आॅडिट’मुळे ते पुराव्यांसह उघड झाले आहेत. दायित्व कालावधीत रस्ते खराब झाल्यानंतही संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे टाळले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार बाहेर येईल या भीतीने ५६ पैकी १८ रस्त्यांचेच ‘थर्ड पार्टी आॅडिट’ करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला असल्याची गंभीर बाबसुद्धा यातून समोर आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने गेल्यावर्षी राज्य व जिल्हा नगरोत्थान तसेच स्वत:च्या निधीतून ६ कोटी ५० लाखांची रस्त्यांची कामे करून घेतली होती; परंतु ही रस्त्यांची कामे खराब झाल्याचा आक्षेप काही नगरसेवकांनी केला. तत्कालिन आयुक्तांच्या आदेशाने कनिष्ठ अभियंत्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी तयार केला. त्यावेळी ढोबळमानाने ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगून सरनोबत यांनी संबंधित ठेकेदारांकडून दुरूस्त करून घेण्याचे आश्वासनही दिले होते.
तथापि या सर्व रस्त्यांच्या कामाचे ‘थर्ट पार्टी आॅडिट’ करून घेण्याची मागणी करण्यात आली. ती मान्य करण्यात येऊन हे काम वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे देण्यात आले. त्यांनी आपला अहवाल ७ मार्चला सादर केला. या अहवालात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत; परंतु हा अहवालच अधिकाऱ्यांच्या साखळीने लपवून ठेवला. संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेण्याचे टाळले.



संबंधितांवर फौजदारी करावी : शेटे
शहरातील खराब झालेले रस्ते आणि ठेकेदारांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न लक्षात घेता महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याने संबंधित सर्व अधिकारी व ठेकेदारांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे पुराव्यांसह केली. अशाच प्रकारच्या मागणीचे निवेदन आपण नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे करणार असल्याचे शेटे यांनी पत्रकारांना सांगितले.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अशा प्रकरणात कठोर कारवाई करून सर्वांवर गुन्हे दाखल केले होते; मग
कोल्हापूर महानगरपालिकेत का होत नाही, असा सवालही शेटे यांनी उपस्थित केला. बुधवारी पत्रकार परिषदेत अधिकारी-ठेकेदार यांच्यातील साखळीचा शेटे यांनी पर्दाफाश केला.


१८ रस्त्यांच्या कामात ७३ लाखांचे नुकसान
‘वालचंद’ महाविद्यालयाने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी दिसून आल्या. रस्ते करण्यापूर्वी क्रॅचेस केलेले नाही, डांबराचे प्रमाण कमी आहे. खडीचा दर्जा चांगला नाही, डांबर व खडी मिक्सिंग एकदम कमी प्रमाणाचे आहे, तसेच अपुरे मटेरियल वापरले आहे, अशी निरीक्षणे ‘वालचंद’ने नोंदविली आहेत. या अठरा रस्त्यांच्या कामात महानगरपालिकेचे ७२ लाख ९९ हजार ७३३ रुपयांचे नुकसान झाले आहे. जर अठरा कामांत एवढे नुकसान झाले असेल तर प्रत्यक्षात ५६ रस्त्यांमध्ये किती नुकसान झाले असेल? हा प्रश्न नव्याने तयार झाला आहे.


५६ रस्ते खराब, आॅडिट मात्र १८ रस्त्यांचे
गतवर्षी प्रशासनाने ५६ रस्ते केले. त्यातील बहुतांशी रस्ते खराब झाले. जेव्हा या रस्त्यांचे टेक्निकल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा केवळ १८ रस्त्यांचीच यादी देण्यात आली. वास्तविक ५६ रस्त्यांची यादी देणे आवश्यक असताना तसे का केले नाही, भ्रष्टाचार बाहेर येईल, या भीतीनेच १८ रस्त्यांची यादी देण्यात आल्याचा आरोप शेटे यांनी केला.


केवळ दहा टक्केच दुरुस्ती : खराब रस्ते संबंधितांकडून दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले होते. या आश्वासनांप्रमाणे त्यांनी ५६ पैकी केवळ दहा टक्के रस्त्यांची दुरुस्ती करून घेतल्याचे नाटक केले. ७ मार्चला ‘वालचंद’चा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला पण तो लपवून ठेवला. अठरा रस्त्यांच्या कामाची संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेणे अपेक्षित होते. मात्र, हे प्रकरणच दाबून ठेवले, असा आरोप भूपाल शेटे यांनी केला.

Web Title: Millennium Roads Scam in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.