लाख लिटर दूध संकलन ठप्प
By admin | Published: June 3, 2017 12:57 AM2017-06-03T00:57:18+5:302017-06-03T00:57:18+5:30
लाख लिटर दूध संकलन ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा थेट फटका जिल्ह्यातील दूध संघांना बसला आहे. ‘गोकुळ’, ‘वारणा’सह ‘स्वाभिमानी’ दूध संघाच्या रोजच्या संकलनात तब्बल एक लाख लिटरहून अधिक घट झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात कमालीची वाढ झाली असून बाजार समितीमध्ये शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढीच बटाट्याची आवक झाल्याने शनिवारपासून या मार्केटबरोबरच भाजीपाला मार्केट कोलमडणार हे निश्चित आहे.
शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, शेतीमालाला हमीभाव द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी गुरुवारपासून संपावर गेले आहेत शेतीमाल बाजारात घेऊन आणायचा नाही, त्याचबरोबर पुणे, मुंबईला जाणारे दूध वाहतूक रोखण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याने राज्यांत अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कोल्हापुरात हिंसक आंदोलन नसले तरी शेतकऱ्यांनी स्वत:हून भाजीपाला मार्केटला पाठविणे बंद केले आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटला शुक्रवारी सुटी होती. त्यामुळे भाज्यांची आवक होण्याचा प्रश्नच नव्हता. शनिवारी मार्केट चालू राहणार असले तरी ५ टक्केही भाज्यांची आवक होईल का? याबाबत खरेदीदारांबरोबरच बाजार समिती प्रशासन संदिग्ध आहे. समितीमध्ये रोज निपाणी, शिरोळ, सांगली, विजापूर येथून १५०० ते २ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होते; पण आज १०० ते १५० क्विंटल आवकही होण्याची शक्यता कमी आहे. बाजार समितीमध्ये रोज ३५ ते ४० ट्रक कांदा-बटाट्याच्या गाड्यांची आवक होते पण शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढाच बटाट्याची आवक झाल्याने येथून पुढे कांदा-बटाटा मार्केटवर त्याचा परिणाम होणार आहे.
भाजीपाल्याप्रमाणेच दूध खरेदी व विक्रीवर संपाचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून संघास दूध पाठविण्यास बंद केल्याने जिल्ह्णातील प्रमुख दूध संघाच्या संकलनात लाख लिटरपेक्षा अधिक घट झाली आहे.‘गोकुळ’चे रोज सरासरी दहा लाख लिटर संकलन होते; पण शुक्रवारी ३५ ते ४० हजार लिटर दूध संकलनात घट झाली आहे. सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यात बसला आहे. पोलीस बंदोबस्तात मुंबई, पुणे येथे दूध वाहतूक सुरू असल्याने विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही.
वारणा दूध संघाच्या संकलनात शुक्रवारी २५ हजार लिटरची घट झाली आहे. कार्यक्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी दूध घालणे बंद केले आहे पण पुणे येथे दूध वाहतुकीस अडचण आल्याने सुमारे १५ हजार लिटर दूध विक्रीचा फटका बसला आहे. ‘स्वाभिमानी’ दूध संघाचे सलग दुसऱ्या दिवशी संकलन बंद राहिले आहे. रोज ६५ हजार लिटर दूध संकलन बंद असल्याने विक्री पूर्णपणे थंडावली आहे. ‘स्वाभिमानी’चे रोज १२ हजार लिटर दूध मुंबई मार्केटला जाते; पण गेले दोन दिवस एक थेंबही बाजारात पोहोचलेले नाही.
संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजारपेठेवर हळूहळू परिणाम दिसू लागले असून संप आणखी वाढला तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडणार आहे.
पै-पाहुणे, शेजाऱ्यांना दुधाचे वाटप
शेतकऱ्यांनी संघास दूध घालणे बंद केल्याने हे दूध पै-पाहुणे, शेजाऱ्यांना वाटप केले जात आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात हे चित्र पाहावयास मिळत आहे.
सांगरूळमध्ये संकलन आज बंद
शेतकरी संपास पाठिंबा म्हणून सांगरूळ (ता. करवीर) येथील सहा दूध संस्थांनी आज, शनिवारी दूध संकलन न करण्याचा निर्णय उस्फूर्तपणे घेतला आहे. या गावांतील दोन वेळांचे तब्बल साडेसहा हजार लिटर दूध गोकुळ दूध संघाकडे जाते. गावात शुक्रवारी हरहर महादेव, दत्त, खंडोबा, महालक्ष्मी महिला, ज्योतिर्लिंग आणि विश्वास नारायण पाटील सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. असा सामूहिक निर्णय घेऊन लढ्यास पाठबळ देणारे सांगरूळ हे जिल्ह्णातील पहिले गाव ठरले आहे.
—————————————
‘गोकुळ’ने दूध बंद ठेवून पाठिंबा द्यावा : गावडे
राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपास सगळीकडून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) हा शेतकऱ्यांचा संघ आहे. त्यामुळे संघाने एक दिवस प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईला दूधपुरवठा बंद करून या संपास पाठिंबा द्यावा, अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नामदेव गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.