वादळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:57+5:302021-04-13T04:21:57+5:30
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या वादळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवरही आर्थिक अरिष्ट ...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या वादळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवरही आर्थिक अरिष्ट आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने वीट व्यावसायिक आधीच संकटात असताना आता वादळी पावसाने त्यात भर घातली आहे. विटा तयार करण्यासाठी लागणारा बगँस, कोळसा ,माती व लाकूड पावसात भिजल्याने वीट व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे घातलेल्या विटा भिजून मातीमोल झाल्याने त्या परत तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड पडत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून विटांना मागणी कमी झाली आहे. त्यामुळे हजारो कामगारांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
कोट:- वादळी पावसाचा बांधकाम व्यावसायिकांनाही फटका बसणार असून विटांचे दर महागणार आहेत. याचा आर्थिक भुर्दंड घर खरेदी करणाऱ्यावर होत असतो. त्यामुळे नुकसान झालेल्या वीटभट्टी व्यावसायिकांना शासन स्तरावर मदत मिळाली तर सामान्य माणसाचे घरबांधणीचे व खरेदी करण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.
-जितेंद्र यशवंत (बांधकाम व्यावसायिक, गडमुडशिंगी)
कोट : गेल्या वर्षापासून कोरोना महामारी संसर्गामुळे वीट व्यवसायिक आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आता वादळी अस्मानी संकटामुळे वीट व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पावसामुळे होणारे नुकसान तसेच मजुरांचा पगार व कच्चामाल यांचा ताळमेळ घालून व्यवसाय करणे कठीण बनले आहे.
-अर्जुन गायकवाड, (वीटभट्टी व्यावसायिक, वळीवडे)
कोट: लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नाही आणि काम मिळाले तर वादळी पावसामुळे ते स्थिरावत नाही. कामात खंड पडत असल्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
-संगप्पा पुजारी, (वीटभट्टी कामगार, गाव- नेवरगी, कर्नाटक)
फोटो : १२ गांधीनगर वीटभट्टी
ओळ- अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे झालेले नुकसान व त्यावर काम करणारे हाताश मजूर.
(छाया : बाबासाहेब नेर्ले)