लाखो भाविक ‘जोतिबा’ चरणी चैत्र यात्रा : ‘चांगभलं’चा गजर अन् गुलालाने न्हाला डोंगर; गगनचुंबी सासनकाठ्यांनी लक्ष वेधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:05 AM2018-04-01T01:05:41+5:302018-04-01T01:05:41+5:30
कोल्हापूर : गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, ‘श्रीं’चा अभिषेक, सरदारीरूपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा,
कोल्हापूर : गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, ‘श्रीं’चा अभिषेक, सरदारीरूपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक, अशा श्रद्धापूर्ण वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी (जि.कोल्हापूर) येथील ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरपूर पाऊस पडू दे, पीक चांगले येऊ दे, शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे, असे साकडे देवाला घातले. भाजून काढणाºया उन्हाचा तडाखा असतानाही भक्तीच्या गारव्यासाठी भाविक या सोहळ््यात सहभागी झाले.
श्री जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे कुलदैवत. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यानिमित्त पहाटे तहसीलदार राम चोबे यांच्या हस्ते ‘श्रीं’चा शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरदारीरूपात सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा विनोद मेतके, तुषार झुगर, प्रदीप सांगळे, गजानन आमाणी यांनी बांधली. दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन झाले.
यावेळी आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, शंभूराजे देसाई, कºहाडचे आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटील, वाडी रत्नागिरीच्या सरपंच रिया सांगळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जोतिबा मंदिर विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
पहिल्या टप्प्यातील कामासाठी येत्या आठवड्याभरात निविदा काढण्यात येतील. सायंकाळी साडेपाच वाजता ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सायंकाळी सात ते आठ या वेळेत पालखी यमाई मंदिरात थांबून त्यानंतर पुन्हा मंदिराकडे आली. रात्री दहा वाजता ‘श्रीं’ची आरती, धुपारती होऊन देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले.
सासनकाठीची प्रतीक्षा : दरवर्षी दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. यंदा मात्र पालकमंत्री पाटील हे खूप लवकर मंदिरात आले. दुपारी सव्वा बारा वाजता देवाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळ देवस्थानच्या कार्यालयाजवळ थांबले आणि लगेच उत्तर दरवाज्यासमोर सासनकाठ्यांच्या पूजनासाठी आले. त्यांच्यासोबत आमदार, शासकीय अधिकारी होते. मात्र, निनाम पाडळीची प्रथम क्रमांकाची सासनकाठी आलीच नव्हती. पाऊण तास वाट पाहिल्यानंतर ठरल्याप्रमाणे सव्वा वाजता या सासनकाठीचे आगमन झाले. पहिल्या दोन सासनकाठ्यांचे पूजन झाल्यावर त्यांच्यासह मान्यवर निघून गेले. ु
जोतिबाला प्रिय अशा गुलाल-खोबºयाची उधळण केली जाते. यासाठी विशेष राजापुरी खोबरे लागते; तर गुलालासाठी खास सरपंच, सम्राट, समाधान या गुलालालाही विशेष मागणी होती. याकरिता १७५ टन राजापुरी सुके खोबरे, तर १८ लाखांहून अधिक नारळांची आवक या काळात जोतिबा डोंगरावर झाली. तीनशे टनांहून अधिक गुलालाचीही उधळण झाली. जोतिबाला प्रिय असा लाखो रुपयांचा ‘दवणा’ विकला गेला; तर प्रसाद, पूजेचे साहित्य, खेळणी, आदींच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.