कोल्हापूरला आॅनलाईन ‘कॅसिनो’चा विळखा लाखोंची उलाढाल : सॉफ्टवेअरच्या करामतीने बुकीचालक मालामाल, खेळणारे कंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:55 AM2018-05-09T00:55:55+5:302018-05-09T00:55:55+5:30
तानाजी पोवार।
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाला बेकायदेशीर व्यवसायांनी घेरले असतानाच मटका, जुगारापाठोपाठ आता काही बुकी व लॉटरीचालकांनी आॅनलाईन गेम्सकडे मोर्चा वळविला आहे. ‘ओन्ली फॉर अॅम्युझमेंट’ अशी ओळ टाकून खुलेआमपणे ‘कॅसिनो’च्या नावाखाली त्यांनी चक्क जुगार चालविला आहे. संपूर्ण महाराष्टÑात ‘कॅसिनो’ला पूर्णत: बंदी असली तरीही मटका बुकी व काही लॉटरीचालकांनी कॅसिनोचे सॉफ्टवेअर तयार करून कोल्हापूर जिल्ह्णात पाय पसरले आहेत.
‘कॅसिनो’ जुगाराच्या माध्यमातून रोज लाखोांची उलाढाल होत असताना पोलीस खाते मात्र अनभिज्ञता दाखवीत आहे. कोल्हापूर, इचलकरंजीसह निमशहरी भागांतही या ‘कॅसिनो’ने जाळे विणले आहे. खेळणारे एक रुपयापासून लाखो रुपयांपर्यंत एकाच वेळी हा गेम खेळू शकतात. आॅनलाईन व्यवसायात सॉफ्टवेअरच्या करामतीवर हे बुकी, लॉटरीचालक मालामाल होत आहेत. मटका व्यावसायिकांनी आता काळानुरूप आधुनिकता स्वीकारली आहे. कोल्हापूर व इचलकरंजी येथे मटका बुकींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. देशभरात फक्त गोवा राज्यात ‘कॅसिनो’ या गेम्सला परवानगी आहे. त्याशिवाय महाराष्टÑासह इतर राज्यांत ‘कॅसिनो’ला पूर्णपणे बंदी आहे; पण सध्या कॅसिनो गेम आॅनलाईनच्या रूपाने जगभर पोहोचला आहे. आॅनलाईन कॅसिनो खेळणाऱ्या कंपन्यांची एजन्सी कोल्हापूर व इचलकरंजी या भागांत मटका बुकी व काही लॉटरी व्यावसायिकांनी घेतली आहे. कॅसिनो खेळणारा वर्ग ठरावीकच आहे. एकावेळी लाखोंचा खेळ तो खेळू शकतो; पण जोड नंबर एकाच वेळी फक्त जास्तीत जास्त ५००० रुपयांपर्यंत खेळता येतो. कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, मध्यवर्ती एस. टी. स्टॅँडवर चौक, गोखले कॉलेज चौक येथे कॅसिनो जुगार राजरोसपणे सुरू आहे. या कॅसिनोचे कोल्हापूरचे मुख्य केंद्र हे लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर असून तेथूनच सूत्रे हलविली जातात.
कमी जागेत लाखोंचे व्यवहार
एखाद्या दुकानगाळ्यात आठ ते दहा कॅसिनो गेम्सची संगणक ठेवून त्याद्वारे हे लाखोंची उलाढाल होत आहे. कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी हा कॅसिनोचा जुगार सुरू असला तरी लक्ष्मीपुरीतीलच एका स्वतंत्र कार्यालयातून या व्यवसायाचे आर्थिक नियंत्रण केले जाते. त्यामुळे ‘कॅसिनो’मध्ये मोठी रक्कम लागल्यास ‘त्या’ नियंत्रण कक्षातून ही रक्कम त्वरित पोहोच केली जाते. कोट्यवधींची उलाढाल असणाºया या कॅसिनो जुगार व्यवसायात बुकीमालकाच्या नियंत्रण कक्षातील व्यवस्थापकावर प्रचंड विश्वास. दुचाकीवरून येणारा व साध्या गणवेशात दिसणारा हा व्यवस्थापक लाखोंची रक्कम रोज बाळगून असतो. तोच या कॅसिनोचे शहरातील केंद्रबिंदू आहे.
एक मिनिटात निकाल
‘कॅसिनो’ हा जुगार दिवसभर आॅनलाईन सुरू असतो. त्यासाठी एक मिनिट दिला जातो. त्यापैकी अर्ध्या मिनिटात नंबरवर पैसे लावणे आणि उर्वरित अर्धा मिनिटात एखाद्या अंकाचा लाईट लागून निकाल जाहीर केला जातो. प्रत्येक मिनिटाच्या खेळात बुकीमालक हा मालामाल होतोच; पण कॅसिनो जुगार खेळणारा मात्र कंगाल होतो. कॅसिनोच्या सॉफ्टवेअरमध्ये तशीच रचना केल्याचे दिसून येते. त्यामुळे मिनिटात लखपतीचा भीकपती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
कोठे सुरू आहे कॅसिनो..
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर
चौकात तीन ठिकाणी
मध्यवर्ती बसस्थानक चौकात
चार ठिकाणी
गोखले कॉलेज चौकात एका ठिकाणी
इचलकरंजी : वर्दळीच्या भरचौकात
हातकणंगले : मुख्य चौकात
कुरुंदवाड, शिरोळ, वडगाव,
कागल स्टॅँड परिसर.