सांगरुळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड, दुरुस्तीचे लाखो रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:28+5:302021-04-29T04:18:28+5:30

कोपार्डे : करवीर तालुक्यातील ७ व पन्हाळा तालुक्‍यातील ४ गावांसाठी वरदान ठरलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सांगरूळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड पडले ...

Millions of rupees spent on repairing the pillars of Sangrul dam | सांगरुळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड, दुरुस्तीचे लाखो रुपये पाण्यात

सांगरुळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड, दुरुस्तीचे लाखो रुपये पाण्यात

Next

कोपार्डे : करवीर तालुक्यातील ७ व पन्हाळा तालुक्‍यातील ४ गावांसाठी वरदान ठरलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सांगरूळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड पडले असून बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोनच वर्षांपूर्वी या बंधाऱ्याचे मजबुतीकरण व दुरुस्तीवर ४० ते ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे हा पैसा पाण्यात गेला आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिमेला आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील सांगरूळ बंधारा १९४९ मध्ये उभारण्यात आला होता. सांगरुळ-कुडित्रेदरम्यान कुंभी नदीवरील हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा करवीर तालुक्यातील सांगरुळ, कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे, तर पन्हाळा तालुक्यातील मरळी, मोरेवाडी, मल्हारपेठ, सावर्डे अशा ११ गावांना वरदान ठरला होता.

पण गेल्या पाच-सहा वर्षापासून या बंधाऱ्याच्या पिलरना असलेले दगड मोठ्या प्रमाणात निखळू लागले होते. धरण संस्थेचे उत्पन्न व बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च यात ताळमेळ बसेना. तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून बंधाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी २० लाख ७२ हजार रुपये मंजूर करून आणले होते. या निधीत धरण संस्थेने आपल्या उत्पन्नातून २० लाख रुपये घालून दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निविदा काढली होती. मात्र बंधाऱ्यातील बर्गे घालण्याच्या गाळ्याचेच काम करण्यात आले. पिलरच्या कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी ४० ते ४५ लाख रुपये खर्च करूनही बंधाऱ्याच्या ७, ८ व ९ नंबरच्या पिलरचे दगड मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. एका पिलरचे दगड तर आरपार ढासळल्याने पावसाळ्यात बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेमका येथे पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो. अशावेळी हे आरपार दगड निखळलेले पिलर टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

फोटो : २८ सांगरुळ बंधारा

कुंभी नदीवर असलेल्या सांगरुळ बंधाऱ्याच्या पिलरचे निखळून पडलेले दगड, तर गाळ्याचे काम निकृष्ट झाल्याने लाकडी बरगे खाली-वर बसवले आहेत.

(फोटो प्रकाश पाटील)

Web Title: Millions of rupees spent on repairing the pillars of Sangrul dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.