कोरोनातील कोट्यवधीच्या साहित्याला गंज, कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
By भारत चव्हाण | Published: July 13, 2024 04:54 PM2024-07-13T16:54:15+5:302024-07-13T16:55:13+5:30
गरज सरो अन् वैद्य मरोचा अनुभव
भारत चव्हाण
कोल्हापूर : ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी एक मराठीत म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यंतर महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे येऊ लागला आहे. कोरोना सारख्या महामारीवेळी हात पसरून राज्य सरकार तसेच काही सामाजिक संस्थांकडून उपलब्ध करून घेतलेले कोविड सेंटरसाठीचे वैद्यकीय साहित्याची गरज संपल्याने अक्षरश: गंजून चालले आहे. एका माजी नगरसेवकाने किमान साहित्य सुरक्षितस्थळी ठेवले असले तरी बाकीच्या कोविड सेंटरमधील साहित्य गेले कोठे याचा थांगपत्ता लागत नाही.
कोविडची साथ पसरली आणि कोल्हापुरात २२ मार्चनंतर लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये कोरोनाची साथ पसरली नाही; परंतु लॉकडाऊन उठविला गेला, नागरिक रस्त्यावर यायला लागले तशी कोरोनाची साथ पसरली. बघता बघता हजारोंच्या घरात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली. आजार नवीन, उपचार कसे करायचे, कशा पद्धतीची औषधे द्यायची याबाबत सगळाच गोंधळ होता. रुग्णांची संख्या आणि रुग्णालयातील बेडची संख्या यात प्रचंड मोठी तफावत निर्माण झाली.
रुग्णांना कुठे ॲडमिट करून घ्यायचे हा आरोग्य यंत्रणेसमोरचा गंभीर प्रश्न होता. त्यामुळे देशपातळीवर कोविड सेंटर, विलगीकरण केंद्र या संकल्पना पुढे आल्या. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांना लागणारे वैद्यकीय उपकरणे, बेड, गाद्या, बेडशीट, चादरी, उशा, सिलिंडर, व्हेंटिलेटर आणायची कुठून असा गंभीर प्रश्न होता. तरीही तत्कालीन काळात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अनेकांकडून मदत गोळा करून कोविड सेंटर उभी केली.
संकटच मोठे असल्याने राज्य सरकारबरोबरच अनेक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन लागणाऱ्या सर्व वस्तू कोविड सेंटरना उपलब्ध करून दिल्या. अनेक अडचणीतून हे साहित्य मिळविले. रुग्णांची चांगली सोय झाली. कोल्हापुरातील दुधाळी पॅव्हेलियन येथील कोविड सेंटरसाठी अनेकांनी लोखंडी बेड, चादरी, उशा, बेडसिट, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिली. त्याचा रुग्णांना मोठा लाभ झाला.
परंतु कोरोनाची साथ संपल्यानंतर दुधाळी पॅव्हेलियनमधील कोविड सेंटरचे साहित्याचे काय झाले याबाबत कोणीही विचारणा केलेली नाही. ज्यांनी हे कोविड सेंटर चालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्या माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी हे साहित्य त्यांच्या ताब्यात ठेवले आहे. त्यांनी प्रशासनाला अनेक वेळा आठवण करून दिली. कॉट, गाद्या, बेडिसिट, चादरी, उशा, कपाटे, ऑक्सिजन सिलिंडर अन्य रुग्णालयात नेऊन रुग्णांना त्याचा लाभ द्यावा, अशी विनवण्या करून जाधव थकले आहेत. परंतु, मनपा आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष दिलेले नाही.
१०० गॅस सिलिंडर, ८० लाेखंडी बेड
एका गोदामात ठेवलेल्या या साहित्यामध्ये नवी कोरा १०० गॅस सिलिंडर, ८० लोखंडी कॉट, तेवढ्याच गाद्या, बेडशीट, चादरी, उशा, कपाटे यांचा समावेश आहे. ते आता गंजायला लागले आहे. ऑक्सिजन सिलिंडरचे वरील कव्हरसुद्धा काढलेले नाहीत. या सर्व साहित्यांतून शंभर बेडचे एक रुग्णालय होऊ शकेल इतके साहित्य बेवारस स्थितीत पडलेले आहे.
बाकीचे साहित्य गेले कोठे ?
दुधाळी कोविड सेंटरमधील साहित्य किमान माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे एका ठिकाणी सुरक्षित तरी आहे. परंतु, बाकीच्या कोविड सेंटरमधील साहित्य कोठे गेले, त्याचे रेकॉर्ड महापालिकेकडे नाही.