माझ्या घरातील सभासद कमी करा
By admin | Published: June 10, 2015 11:54 PM2015-06-10T23:54:04+5:302015-06-11T00:15:23+5:30
बिद्री कारखाना : प्रकाश आबिटकर यांचे के. पी. यांना आव्हान
गारगोटी : बिद्री साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत माझ्यावर आरोप करणाऱ्या ‘बिद्री’च्या अध्यक्षांनी माझ्या घरातील सभासद खरोखर चुकीचे असतील, तर ते रद्द करून चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी माझ्यापासून करावी. याचबरोबर १७ हजार सभासदांमधील चुकीचे सभासद रद्द करून त्यांनी कारखान्याचे हित जोपासावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी ‘बिद्री’चे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव न घेता केले.
ते गारगोटी (ता. भुदरगड) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमराव शिंदे होते.
यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, चुकीचे १७ हजार सभासद कमी केल्यास त्यांचा बिद्रीच्या माळावर सत्कार करण्यात येईल. मात्र, तसे न केल्यास येत्या निवडणुकीत ५३ हजार सभासद त्यांना त्यांची जागा दाखवतील. आपण मागील तीन वर्षे बिद्रीच्या चुकीच्या कारभारावर सतत बोलत आहे. जुन्या असणाऱ्या ५३ हजार सभासदांना ऊस तोडणीत न्याय न देणारे संचालक मंडळ बोगस कागदपत्रे जोडून केवळ कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून १७ हजार सभासदांना वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. एका
बाजूला साखर उद्योग अडचणीत असताना ही चाललेली उधळपट्टी कारखान्याला न परवडणारी असून, त्याचा भार सभासदांना सोसावा लागणार आहे.
कार्यक्रमात गारगोटी ग्रामस्थांच्या वतीने एम. जी. चौगले, शामराव मुगडे, सखाराम चौगले यांच्या हस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच महालवाडी पाणंद रस्ता व महादेव चौक ते तेली गल्ली या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाई आबिटकर पंचायत समिती सदस्या विजयमाला चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर,
सरपंच छाया सारंग, छाया चव्हाण, धनाजी खोत, सदाशिव खेगडे, आर. जी. पाटील, प्रल्हाद आबिटकर, बी. के. कांबळे, मनोहर परीट, दत्तात्रय तेली, तुकाराम राऊत, अल्ताफ बागवान, सतीश कांबळे, सरिता चिले, सीता मोरे, आदी उपस्थित होते.
अरुण शिंदे यांनी स्वागत,
तर सर्जेराव मोरे यांनी प्रास्ताविक केले. रूपाली राऊत यांनी आभार मानले.