मंत्री अशोक चव्हाण म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:06+5:302021-05-16T04:24:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. चव्हाण यांना कसलेही स्वातंत्र्य नाही, ते आता पोपटासारखे बोलत आहेत; पण त्यांचा पिंजऱ्यातील पोपट झाला आहे, अशीही टिपणी त्यांनी केली.
आरक्षण मर्यादेवरून मंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी हात-पाय बांधून तलवार हाती दिली तर लढणार कसे, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडताना त्यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवावे अशीही मागणी केली. चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद भूषविलेला पुन्हा कमी दर्जाचे खाते सांभाळताना दिसत आहे. हे म्हणजे तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखे आहे. त्यांची वक्तव्ये पाहता त्यांच्यावर आता वेड्याच्या रुग्णालयात जायची वेळ आली आहे. तुम्ही फार हुशार आहात, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, दोन वर्षे काय करीत होता, अशी टिपणीही खोत यांनी केली.
खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण करंट्या महाविकास सरकारमुळे रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात योग्यरीत्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांनाही सोबत घेतले नाही. वकिलांना मार्गदर्शन केले नाही. गायकवाड समितीतील महत्त्वाचे पुरावे जोडले नाहीत. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले; पण राज्य सरकार का गेले नाही. यावरून सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट होते.
----------------------------------------
तेव्हा तुमचे हात-पाय बांधले होते का
खोत म्हणाले, तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर होतात, तेव्हा तुमचे कोणी हात-पाय बांधले होते का. ज्यांना आरक्षण नको त्या मराठा नेत्यांनी खुराड्यात बसून अंडी घालावीत. हे सरकार मराठ्यांचे शत्रू आहे. सारथी संस्था या सरकारने बंद पाडली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळही राज्य नियोजन मंडळात विलीन केले. नाव मराठ्यांचे घेऊन सरदारकी भोगणारे हे सगळे चोराच्या आळंदीला जायला निघाले आहेत.