मंत्री अशोक चव्हाण वेड पांघरून पेडगावला चाललेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:23+5:302021-05-07T04:27:23+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते मराठा समाजाची दिशाभूल ...
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते मराठा समाजाची दिशाभूल करताना वेड पांघरून पेडगावला चाललेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
मंत्री चव्हाण यांनी मराठा आरक्षण रद्दबाबतच्या पत्रकार परिषदेत १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणाबाबतचे अधिकार राज्यांना नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा पाटील यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले,१०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला आहेत, हे उच्च न्यायालयानेही मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात अटर्नी जनरल यांनीही हेच मत मांडले आहे. परंतु चव्हाण यांना हे मान्य नाही. ते सभागृहाची दिशाभूल केल्याचे सांगत आहेत. २८८ विधानसभेचे आणि ७८ विधानपरिषदेचे आमदार इतके लहान नाहीत, की त्यांना कळत नाही.
महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू नीटपणे मांडता आलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार होते, तेव्हा मराठा आरक्षण करून का घेतले नाही, असे चव्हाण विचारतात. तर त्यांना माझा सवाल आहे की, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळातही दोन्हीकडे काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हा आरक्षण का नाही दिले? अजूनही राज्याच्या मागास आयोगाने पुन्हा एकदा आक्षेपांचा अभ्यास करून, मराठा समाज कसा मागास आहे हे पटवून द्यावे. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. तेथून तो राष्ट्रपतींकडे जाईल. त्यांनी होकार दिल्यानंतर हा कायदा राज्यालाच करावा लागणार आहे. चेंडू राज्याच्याच कोर्टात आहे. परंतु राज्यात अजून मागासवर्ग आयोगच का नेमला नाही, याचे उत्तर चव्हाण यांनी द्यावे.
चौकट
मराठा समाज पुढारलेला आहे, हे सहा आयोगांनी सांगितले
याआधीच्या सहा आयोगांनी मराठा समाज हा पुढारलेला आहे, हे लेखी स्पष्ट केले आहे. परंतु तेव्हाच्या सरकारांनी हे अहवाल का नाही फेटाळले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांचा आयोग नेमून, मराठा हे मागास आहेत याची मांडणी केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, ही भूमिका असलेल्या चव्हाण यांनी समाजाची दिशाभूल थांबवावी.