शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:04 PM2024-04-27T12:04:57+5:302024-04-27T12:06:25+5:30
आगामी विधानसभेसाठी दिले खुले आव्हान
कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत भाजप व शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे षडयंत्र तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेच होते. असा घणाघातील आरोप भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांना शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा निवडणूकीत त्यांनी कोल्हापूरातील कोणत्याही मतदारसंघातून उभे रहावे, चितपट करु, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
आर. डी. पाटील म्हणाले, भाजपमध्ये तीस वर्षापेक्षा अधिक काळ प्रामाणिकपणे काम केले. पक्षाचा पहिला नगरसेवक म्हणून निवडून येत असतानाच महापालिकेच्या सभागृहात सलग २५ वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण, पक्ष सत्तेत आल्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. कोल्हापूर महानगर अध्यक्षही दिले नाही. देवस्थान समितीचे अध्यक्ष करण्याचा शब्द दिला तोही पाळला नाही.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत शासकीय यंत्रणेचा अहवाल आपणाला उमेदवारी द्यावा, असा असताना दुसऱ्याला दिली. २०१९ च्या निवडणूकीत भाजपच्या काेअर कमिटीत आपण होतो. त्यावेळी शिवसेनेचे सहाही उमेदवार पाडण्याची रणनिती चंद्रकांत पाटील यांनी आखली होती. ‘शिरोळ’ येथे अनिल यादव यांना, तर हातकणंगले येथे भाजपचे अशोकराव माने यांना जनसुराज्यकडे पाठवले. ‘चंदगड’मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक शिवाजी पाटील हे विजयी होणार म्हणून तिथे अशोक चराटी यांना बंडखोरी करायला लावली.
अमल महाडीक, सुरेश हाळवणकर यांच्या पराभवाला कारणीभूत कोण आहे? हे जगजाहीर आहे. पक्षात अशाच व्यक्तींच्या शब्दाला मान असेल आणि आयुष्य पक्षासाठी घालणाऱ्या आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची किमंत नसेल तर पक्षात कशाला रहायचे? म्हणून पक्ष सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आर. डी. पाटील यांनी सांगितले.
बिन आवाजाचा बॉम्ब
आगामी विधानसभा निवडणूकीच्या अगोदर कोल्हापूरात बिन आवाजाचा बॉम्ब फोडणार आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मग, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पाटील यांना मंत्री सोडाच पण विधानसभेची उमेदवार देणार नसल्याचा इशारा आर. डी. पाटील दिला.
देवाणघेवाण करूनच आर. डी. पाटील यांचे आरोप - महेश जाधव
कोल्हापूर : बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नसतो हे आर. डी. पाटील यांनी लक्षात ठेवावे. पाच वर्षांपूर्वीच्या प्रकाराची पाटील यांना आत्ताच का आठवण झाली? देवाणघेवाण करूनच पाटील यांनी केवळ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बदनामीसाठी हे आरोप केले आहेत, असे पत्रक भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
जाधव म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी एक सोडून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाडण्याचे आदेश दिले, असा बिनबुडाचा आरोप पाटील यांनी केला. ज्या आर. डी. पाटील यांचे राजकारण चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्यावर उभारले, तेच कृतघ्न होऊन विरोधी गोटात दाखल झाले आहेत. गेल्या वेळी महापालिकेला केवळ हट्टापायी तुम्हाला व तुमच्या कन्येला तिकीट दिले. पण तुम्ही दोन्ही मतदारसंघात हरलात. पुन्हा आरोप केल्यास भाजप कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील.