‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते कसे चालते, मंत्री छगन भुजबळांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:30 AM2022-03-14T11:30:11+5:302022-03-14T11:31:09+5:30
दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही भाजपची नीती
कोल्हापूर : फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुसती चौकशी सुरू आहे, कारवाई झालेली नाही. तोपर्यंत भाजपने राज्यभर दंगा सुरू केला आहे. ‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते भाजप नेत्यांना कसे चालते? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री भुजबळ हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री भुजबळ म्हणाले, माजी मुख्यमंत्री पदाला वेगळा दर्जा असतो, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या घराकडे गेले. प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे हे भाजपने ठरवले आहे. त्यांची ही गोबेल्स नीती आहे.
राज्य सरकारला येनकेन प्रकारे त्रास देणे, अटक करणे, ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा भाजप पुरेपूर वापर करत आहे. मात्र जोपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी हे सरकारबाबत ठाम आहेत तोपर्यंत सरकार कोणीही पाडू शकणार नसल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
चौकशी यंत्रणेने मंत्री नवाब मलिक यांना अटक करून अन्याय केला आहे, आता आम्ही राजीनामा घेऊन आणखी अन्याय करणार नाही. न्यायालयात पुरावे सादर होऊ देत, मग बघू. ते मुस्लीम समाजाचे आहेत, म्हणून ‘ईडी’ ५५ चे ५ लाख करून दाऊदशी संबध जोडणार असेल तर हे चालणार नाही.
दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही नीती भाजपची असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
भाजपचा चढता सुरज...खाली खाली
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार पुन्हा आले असले तरी त्यांचे ५० आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे देशभरात भाजपचा चढता सुरज हळूहळू खाली येत असल्याची टीका मंत्री भुजबळ यांनी केली.