मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

By विश्वास पाटील | Published: October 2, 2023 05:35 PM2023-10-02T17:35:22+5:302023-10-02T17:36:29+5:30

'मुंबईतील बैठकीला कोल्हापुरातील शिष्टमंडळाला बोलवण्याची जबाबदारी आमची'

Minister Hasan Mushrif Always Support Maratha Reservation, Explains NCP | मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

googlenewsNext

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. मराठा आंदोलनांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमवारी प्रसिद्धीला दिले आहे. मराठा समाजाला मंत्री मुश्रीफ यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही त्यांची भूमिका त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केली आहे.

या पत्रकावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, महिला जिल्हाध्यक्षा  शितल फराकटे, कागलचे नगरसेवक नितीन दिंडे, राष्ट्रवादीचे इचलकरंजीचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, विनायक फाळके, प्रकाश गवंडी या प्रमुखांच्या सह्या आहेत.

पत्रकात  म्हटले आहे की, १५ ऑगस्टला शासकीय ध्वजारोहनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. त्यावेळी सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.  त्या बैठकीमध्ये हा प्रश्न माझ्या एकट्याच्या पातळीवरील नसून यासंदर्भात मुंबईत बैठक लावू, असेही त्यांनी सुचित केले होते. दरम्यानच्या काळात जालना येथे मनोज जरांगे -पाटील यांनी उपोषण सुरूही केले. तिथे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद म्हणून महाराष्ट्रभर मोठा असंतोष निर्माण झाला. त्याच कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरामध्ये दहा सप्टेंबरला राष्ट्रवादीची उत्तरदायित्व सभा होती. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित झाले. 

जरांगे- पाटील यांचा विषय ज्वलंत बनल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली नाही. ही सर्व वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, गैरसमज करून घेऊ नये. ज्यावेळी मुख्यमंत्री बैठक बोलावतील त्यावेळी कोल्हापुरातील शिष्टमंडळाला बोलवण्याची जबाबदारी आमची राहील असेही सांगितले.

Web Title: Minister Hasan Mushrif Always Support Maratha Reservation, Explains NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.