भाजपने आता सत्तेचे नाव काढायचे नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:48 AM2022-02-22T11:48:20+5:302022-02-22T11:48:45+5:30
सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारचे काम सुरू असल्याने, भाजपने पुढच्या निवडणुकीत सत्तेचे नाव काढायचे नाही
कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या धर्तीवर शेतमजूर, ड्रायव्हर, यंत्रमाग कामगारांसह ३६ कल्याणकारी मंडळाची स्थापना लवकरच करणार आहे. राज्यातील ४ कोटी असंघटित मजुरांना संरक्षित करत असतानाच, त्यांच्या जीवनात स्थैर्य आणणार असून, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारचे काम सुरू असल्याने, भाजपने पुढच्या निवडणुकीत सत्तेचे नाव काढायचे नाही, असा विश्वास ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व दिशा फाउंडेशनच्या वतीने सोमवारी शाहू मार्केट यार्ड येथे बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ वाटप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के.पी. पाटील होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, बांधकाम मंडळाकडे १३ हजार कोटी शिल्लक असून, त्याचे व्याज व महिन्याला जमा होणारे २५० कोटीही खर्च होत नाहीत, ही शोकांतिका असून, बांधकामांकडून जमा होणाऱ्या उपकराची तपासणी करणार आहे. गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केले. शेतमजूर, ड्रायव्हर, यंत्रमाग कामगारांसह ३६ प्रकारच्या मंडळाची स्थापना करणार असून, सत्तेचे सोपान हातात आल्यानंतर गोरगरीब माणसाचे कोटकल्याण कसे करता येते, हेच आम्ही दाखवून दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कामगार विभागाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम यांनी प्रास्ताविक केले. ‘दिशा’ फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.अंजली बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. पात्र लाभार्थ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, युवराज पाटील, राजेश लाटकर, सूर्यकांत पाटील, डी.जी. भास्कर, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.
अंजली बोऱ्हाडे यांच्या कामांचे कौतुक
असंघटित कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम बांधकाम मंडळ करत आहे, त्यामध्ये ‘दिशा’ फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला, याबद्दल अंजली बोऱ्हाडे यांचे कौतुक मंत्री मुश्रीफ यांनी केले.
मंडळांसाठी असा करणार सेस गोळा
शेतमजूर - राज्यात १ कोटी १० लाख शेतमजूर असून, मंडळासाठी बाजार समितीवर उपकर बसविणार, त्याचबरोबर खते, बियाणे, शेती औजारे, ठिबक साहित्य आदी कंपन्यांच्या उलाढालीवर अर्धा टक्का मंडळासाठी घेणार.
ड्रायव्हर - मोटारसायकलीपासून ट्रक खरेदीपर्यंत विशेष कर लावणार, त्याचबरोबर डिझेल, पेट्रोलवरही उपकर लावणार आहे.
यंत्रमाग- सूतगिरणींनी खरेदी केलेल्या सुतावर प्रतिकिलो १ रुपया मंडळाकडे जमा करावा लागणार.