जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 04:23 PM2022-01-10T16:23:31+5:302022-01-10T16:29:44+5:30
२१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे.
कोल्हापूर : आणखी चार पाच महिने तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार नाहीत असा अंदाज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘चंदगड’ भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, २१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे प्रशासक म्हणून नेमले जातील. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे. कारण चार, पाच महिने जिल्हा परिषद निवडणुका होणार नाहीत.
कारण ओबीसी आरक्षणाबाबत १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. इम्पिरिकल डाटाचे तुमचे काम प्रगतीपथावर आहे का अशी विचारणा न्यायालयाने महाराष्ट्राला केली होती. त्यानुसार आम्ही मागास आयोगासाठी निधी दिला आहे. मनुष्यबळ दिले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यत निवडणुका घेवू नयेत अशीही मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी तीन, चार महिने वेळ लागेल.
सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पध्दतीने भवन उभारणी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा ११० ते १६० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून आलेल्या सदस्य, सरपंच यांना एका दिवसात जिल्हापातळीवरील सर्व कामे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी सदस्य निधीतून हे ‘चंदगड भवन’ उभारण्यात आले आहे. अशा पध्दतीने ज्या जिल्ह्यात अडचण असेल तेथील जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास तेथेही भवन उभारण्यास सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी मुश्रीफ यांनी दिली.