हसन मुश्रीफ यांना केवळ लाडकी खुर्ची हवी, रोहित पवारांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 01:10 PM2024-10-26T13:10:12+5:302024-10-26T13:14:21+5:30

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आमच्या विचारांबरोबर

Minister Hassan Mushrif only needs a lovely chair, Criticism of MLA Rohit Pawar | हसन मुश्रीफ यांना केवळ लाडकी खुर्ची हवी, रोहित पवारांचे टीकास्त्र

हसन मुश्रीफ यांना केवळ लाडकी खुर्ची हवी, रोहित पवारांचे टीकास्त्र

मुरगूड : शरद पवार यांनी इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना ताकद दिली. तरीही ते त्यांना सोडून गेले. यावर तुम्हाला जायचं असेल तर जा काही फरक पडणार नाही. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आमच्या विचारांबरोबर आहे, असे पवार यांनी सांगितले. पालकमंत्री मुश्रीफ यांना आता जनतेशी देणे घेणे नाही तर त्यांना फक्त लाडकी खुर्ची हवी आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

मुरगूड येथे समरजीत घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील होते. पवार म्हणाले, त्यांच्याजवळ पैसा, कॉन्ट्रॅक्टर, दादागिरी, मलिदा आहे. आमच्याजवळ शरद पवार व त्यांचे आदर्श विचार, निष्ठा, स्वाभिमानी जनता आहे. कागल, गडहिंग्लज, उत्तूरकरांनी यावेळी निष्ठेला, विचाराला ताकद द्यायची आणि गद्दारीला कोणत्याही परिस्थितीत गाडायचे ठरविले आहे. मला माहीत नाही की मुश्रीफांनी येथील जनतेला का पळून गेलो हे सांगितले आहे की नाही. मात्र इथल्या मातीने आपल्याला लढायला शिकवलं आहे, पळून जायला नाही. आम्ही लढलो, ते मात्र पळून गेले. मंत्रिपदासाठी त्यांनी पवार साहेबांच्या विचारांना बाजूला त्यांचा करून अपमान केला.

समरजीत घाटगे म्हणाले, पालकमंत्री कागलचा विकास केला म्हणतात, तर मग येथील जनतेला आरोग्य सेवेसाठी पुण्या-मुंबईला का जावे लागते. हे मंत्र्यांचे अपयश आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, २५ वर्षांत विकासापेक्षा घरे फोडण्याचे तर नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या पराभवाचा विडा जनतेने उचलला आहे. याची जाणीव झाल्याने ते चुकीच्या भाषेचा वापर करत आहेत.

यावेळी उद्धवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, शिवाजीराव खोत, संकेत भोसले, स्नेहलता पाटील, अमरसिंह चव्हाण, अजित मोरे, शिवानंद माळी, सागर कोंडेकर, प्रवीण चौगुले, दयानंद कांबळे, अनिल मोरे, विशाल भोपळे, मारुती पुरीबुवा, सायली महाडिक, बाळासो हेगडे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विश्वजित पाटील, पदमसिंह पाटील, वीरेंद्र घाटगे, संतोष मेंगाणे, नितीन देसाई, एकनाथ देशमुख, सागर पाटील, दयानंद पाटील, बजरंग सोनुले, दत्तामामा खराडे आदी उपस्थित होते. स्वागत विशाल भोपळे यांनी केले. प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले. आभार दगडू शेणवी यांनी मानले.

Web Title: Minister Hassan Mushrif only needs a lovely chair, Criticism of MLA Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.