नवतंत्रज्ञानाच्या जोरावर ‘मंत्री मेटॅलिक्स’ उत्पादन निर्मितीची दिशा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:21+5:302021-07-21T04:17:21+5:30
प्रश्न : मंत्री मेटॅलिक्सची सुरुवात कशी झाली? उत्तर : अकोला तालुक्यातील वाघा बुद्रुक हे आमचे मूळ गाव. येथे आमची ...
प्रश्न : मंत्री मेटॅलिक्सची सुरुवात कशी झाली?
उत्तर : अकोला तालुक्यातील वाघा बुद्रुक हे आमचे मूळ गाव. येथे आमची शेती होती. याठिकाणी झालेल्या धरणांमध्ये शेती गेली. वडील पुरुषोत्तम मंत्री हे मुंबईत असणाऱ्या माझ्या मोठ्या काका गोपालदास यांच्याजवळ आले. त्या ठिकाणी वडिलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीची संधी आली. पण, स्वतःचा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यानुसार तीन हजार रुपयांचे भांडवल घेऊन वडील सन १९७१ मध्ये कोल्हापूरला आले. त्यांनी येथे फौंड्री उद्योगाला लागणारा कच्चा माल पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी हा व्यापार कष्टाने वाढविला. या व्यापारामुळे फौंड्री उद्योगाचा त्यांचा चांगला अभ्यास झाला. त्यांनी ‘एम. एम. ऑटोमोबाइल्स’ या नावाने सुझुकी, स्वराज माझदाची डीलरशिप घेऊन नवीन व्यवसाय सुरू केला. या व्यापार, व्यवसायाच्या पुढे जाऊन स्वतःची फौंड्री सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सन १९९७ मध्ये त्यांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये जागा घेऊन बांधकाम सुरू केले. जुलै १९९६ मध्ये दोनशे टन दरमहा कास्टिंग उत्पादन करणारी मंत्री मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही फौंड्री सुरू केली. प्रारंभी शंभर कामगार होते, तर वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल होती.
प्रश्न : कंपनीच्या प्रगतीबाबत काय सांगाल?
उत्तर : आमच्या कंपनीला पहिली ऑर्डर सन १९९७ मध्ये टाटा मोटर्सची मिळाली. सुरुवातीची तीन वर्षे कमी ऑर्डर होत्या. मुंबईतील यूडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर सन २००० मध्ये मी आमची कंपनी जॉइन केली. ॲटोमोटिव्ह फिल्ड माझ्या शिक्षणाच्या दृष्टीने पाहता मला नवीन होते. तीन वर्षे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फौंड्रीतील बारीक-सारीक गोष्टी मी शिकून घेतल्या. फौंड्री उद्योगामध्ये प्रगती करायची असेल, तर उत्पादन क्षमतेचा विस्तार, विविध क्षेत्रांतील उत्पादनांची निर्मिती आणि जागतिक पातळीवर मार्केटिंग वाढविले पाहिजे, हे लक्षात आले. त्यानुसार दरमहा ७०० टनांपर्यंत उत्पादन करण्याची क्षमता वाढविली. ट्रक, ट्रॅक्टरच्या कास्टिंग्जबरोबर बांधकाम साहित्य, डिझेल इंजिनची जनसेट निर्मिती क्षेत्रात उतरलो. जगभरातील विविध देशांत मार्केटिंग केले. मशीनशॉप अद्ययावत केले. सध्या १५० सीएनसी मशीन्स आमच्याकडे आहेत. या सर्वांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून आर्थिक ताकद दिली. आम्ही बदल स्वीकारत असताना ग्लोबल सोर्सिंगची नुकतीच सुरुवात झाली होती. त्याची मोठी मदत झाली. आम्हाला जर्मनीतील एका कंपनीची पहिली निर्यात ऑर्डर मिळाली. सन २००५ ते २००८ या कालावधीत मंत्री मेटॅलिक्सने रॅॅपिड ग्रोथ केली. दरमहा दोन हजार टन कास्टिंग्ज निर्मितीची आमची क्षमता झाली. टाटा मोटर्सने दिलेल्या पाठबळाच्या जोरावर उत्तरांचलमध्ये फौंड्री सुरू केली. कोल्हापूरमधील कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अद्ययावत फौंड्री सुरू करून कंपनीचा विस्तार केला. अद्ययावत पेंटशॉप असणारी पहिली फौंड्री होण्याचा बहुमान मिळविला. गुंतवणूक वाढली आणि उलाढाल वर्षाकाठी ३०० कोटींपर्यंत पोहोचली. सध्या दोन हजार कामगार आमच्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
प्रश्न : जगभरात ‘मंत्री मेटॅलिक्स’चा ठसा कसा उमटविला?
उत्तर : आपल्या देशाबरोबरच जगभरात कंपनीला नेण्याचा आणि त्याद्वारे कोल्हापूरचा नावलौकिक वाढविण्याचे ध्येय आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे जगभरातील विविध देशांचे दौरे केले. त्यातील काही देशांमध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी नेमले. त्याचा चांगला फायदा झाला. आमच्या कंपनीची निर्यात वाढली. सध्या आमच्या एकूण उत्पादनापैकी ४० टक्के कास्टिंग्जची निर्यात होते. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, यू. के., ब्राझील, मॅॅक्सिको आदी देशांमध्ये आम्ही निर्यात करतो. ट्रक, ट्रॅॅक्टर, डिझेल इंजिनचे जनसेट, रेल्वे, बांधकाम साहित्य या क्षेत्राला लागणाऱ्या कास्टिंग्जचे उत्पादन आम्ही करतो. त्यात फ्लॉयविल असेंब्ली, हाऊजिंग्ज, हॉब्स, ब्रॅकेट आदींचा समावेश आहे. टाटा मोटर्स लिमिटेड, सिम्पसन अँड कंपनी, टाटा कमिन्स लिमिटेड, स्पाईसर इंडिया लिमिटेड, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मान ट्रक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इलजिन ॲटोमोटिव्ह, जॉनडिअर, अशोक लेलँड, ए. बी., व्हॉल्वो, जेसीबी पॉवर सिस्टीम आदी कंपन्यांना कास्टिंग्ज पुरविले जाते. परवडणाऱ्या किमतीमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन, वेळेवर पुरवठा, नावीन्याचा ध्यास या सूत्रानुसार कार्यरत राहिल्याने कमी वेळेत यशाचे विविध टप्पे आम्ही पूर्ण करत जगभरात ‘मंत्री मेटॅॅलिक्स’चा ठसा उमटविला आहे.
प्रश्न : कंपनीची पुढील वाटचाल कशी राहणार आहे?
उत्तर : आज आम्ही ग्राहकांनी दिलेल्या डिझाइननुसार त्यांना कास्टिंग्ज तयार करून देण्याचे काम करतो. मात्र, आम्हाला स्वतःचे उत्पादन तयार करायचे आहे. त्यासाठी कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपिंग विंग तयार केला जाणार आहे. फौंड्रीमध्ये ॲटोमेशन, रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येईल. पुढील पाच वर्षांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल दुप्पटीने वाढविण्याचे ध्येय आहे. पेट्रोल-डिझेल या इंधनाचे वाढत चाललेले दर, कार्बन इमिशन्स कमी करण्याबाबतचे सरकारचे धोरण पाहता भविष्यात फौंड्री उद्योगासमोर आता इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. पारंपरिक वाहनांना जास्त कास्टिंग्ज लागते. याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक व्हेईकल्ससाठी ॲल्युमिनिअम, मोल्डेड प्लास्टिकवर आधारित सुटे भाग लागणार आहेत. त्यादृष्टीने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन निर्मितीची दिशा बदलण्यात येणार आहे.
प्रश्न : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काय केले जाणार आहे?
उत्तर : वडिलांनी मंत्री मेटॅलिक्सची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांना पार्किनसन्सचा त्रास सुरू झाला. मात्र, त्यामध्ये देखील त्यांनी जिद्दीने कार्यरत राहून कंपनीचा विस्तार केला. सुरुवातीला मला खूप मार्गदर्शन केले. त्यांनी मला कंपनीमध्ये काम करताना मोकळीक दिली. त्यामुळे जबाबदारी वाढली. ती यशस्वीपणे पेलून कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. त्यामध्ये कामगार, ग्राहक, पुरवठादार, बँक या घटकांचे मोलाचे योगदान आहे. या घटकांच्या साथीने कंपनीला अधिक प्रगतिपथावर नेण्याचा रौप्यमहोत्सवी वर्षातील माझा संकल्प आहे. ग्राहकांना अधिक संतुष्ट करणारी सेवा द्यायची आहे. आमच्या कंपनीतील कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात देणारी स्कॉलरशिप सुरू केली जाणार आहे. भविष्यातील युग हे कोडिंगचे असणार आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना कोडिंगचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने सीएसआर फंडातून कोडिंग लॅॅब उभारण्यात येणार आहे.
चौकट
कुटुंबीय माझी ताकद
दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या कंपनीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात ते नसल्याचे दुःख वाटते. मात्र, त्यांनी दिलेल्या व्हिजन आणि कामाच्या वारसाच्या माध्यमातून ते माझ्याबरोबर सदैव आहेत. आई सरला, पत्नी श्रुती, मुली सिया आणि सारा, बहिणी पूजा आणि अर्चना हे माझे कुटुंबीय माझी ताकद असून त्यांच्या पाठबळावर व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मी नेटाने सामना करत यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रसाद मंत्री यांनी सांगितले.
चौकट
कोल्हापूरने उद्योगाचा वारसा दिला
माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. सेंट झेविअर्स, विवेकानंद कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील ‘यूडीसीटी’मधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. हे शिक्षण घेतले, तरी आव्हानात्मक असणाऱ्या ॲटोमोटिव्ह फिल्डमध्ये करिअर करण्यात मला आवड होती. त्यानुसार आमच्या कंपनीमध्ये रुजू झालो. वडिलांसह कंपनीतील आणि उद्योग क्षेत्रातील विविध घटकांकडून आणि अनुभवातून शिकत गेलो. मला उद्योगाचा वारसा कोल्हापूरने दिल्याचे प्रसाद मंत्री यांनी सांगितले.
चौकट
सामाजिक बांधिलकी
उद्योगाबरोबर आम्ही सामाजिक बांधिलकी जपली आहे. हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथील शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी मदत केली आहे. आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसह विविध मंदिरांतील उत्सवावेळी प्रसाद वाटप केला जातो. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण उपक्रम राबविले जातात. कामगारांंसाठी विविध योजना राबविल्या जातात. कोल्हापुरातील विक्रम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते. शिक्षणक्षेत्राला मदतीचा हात देण्यावर वडिलांचा अधिक भर होता. तो धागा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. ‘स्मॅक’च्या उपाध्यक्ष, संचालकपदी मी काम केले आहे. फौंड्री उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या फौंड्री क्लस्टर प्रकल्पाच्या मंजुरीपासून त्याची उभारणी करण्यात योगदान दिले असल्याचे प्रसाद मंत्री यांनी सांगितले.
‘मंत्री मेटॅलिक्स’ दृष्टिक्षेपात
स्थापना : जुलै १९९६
कार्यरत क्षेत्र : फौंड्री उद्योग
उत्पादने : फ्लॉयविल असेंब्ली, हाऊजिंग्ज, हॉब्स, ब्रॅकेट आदी कास्टिंग्ज
प्लांट : शिरोली, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, उत्तरांचल.
वार्षिक उलाढाल : ३०० कोटी
कार्यरत कामगार : दोन हजार
काही प्रमुख पुरस्कार : किर्लोस्कर ग्रुपचा बेस्ट सप्लायर अवॉर्ड (१९९१), कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योग पुरस्कार (१९९९-२०००), जॉन डिअरकडून बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड, उत्कृष्ट निर्यात पुरस्कार (२०१०-२०११), विविध गुणवत्ता प्रमाणपत्रे, कोल्हापूर इंजिनिरिंग असोसिएशनकडून गौरव.