नवतंत्रज्ञानाच्या जोरावर ‘मंत्री मेटॅलिक्स’ उत्पादन निर्मितीची दिशा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:36+5:302021-07-21T04:17:36+5:30

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंच्या दूरदृष्टीतून कोल्हापूरच्या उद्यमनगरीची स्थापना झाली. पुढे हाच वारसा उद्योजकांनी जपत कोल्हापूरची ओळख जगभर ...

Minister Metallics will change the direction of manufacturing on the strength of new technology | नवतंत्रज्ञानाच्या जोरावर ‘मंत्री मेटॅलिक्स’ उत्पादन निर्मितीची दिशा बदलणार

नवतंत्रज्ञानाच्या जोरावर ‘मंत्री मेटॅलिक्स’ उत्पादन निर्मितीची दिशा बदलणार

Next

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंच्या दूरदृष्टीतून कोल्हापूरच्या उद्यमनगरीची स्थापना झाली. पुढे हाच वारसा उद्योजकांनी जपत कोल्हापूरची ओळख जगभर नेली. त्यामधील शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ‘मंत्री मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ हे फाैंड्री उद्योगातील एक अग्रगण्य नाव. यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या ‘मंत्री मेटॅलिक्स’ने विविध आव्हानांचा सामना करीत, प्रगतीचा टॉप गीअर टाकत यशाचे शिखर गाठले आहे. उत्तरांचलपर्यंत उद्योगविस्तार करून त्यांनी गरुडभरारी घेतली आहे. आता सरकारचे धोरण पाहता भविष्यात फौंड्री उद्योगासमोर इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन फ्युएल व्हेइकल्सचे तगडे आव्हान असणार आहे. पारंपरिक वाहनांना जास्त कास्टिंग्ज लागते. इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी ॲल्युमिनिअम, मोल्डेड प्लास्टिकवर आधारित सुटे भाग लागणार आहेत. त्यादृष्टीने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादननिर्मितीची दिशा बदलण्यावर आमचा भर राहणार असल्याचे सांगत, उद्योगविश्वातील रौप्यमहोत्सवी वाटचालीचा प्रवास मंत्री मेटॅलिक्सचे मॅॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद पुरुषोत्तम मंत्री यांनी ‘लोकमत’समवेत संवाद साधताना उलगडला.

प्रश्न : मंत्री मेटॅलिक्सची सुरुवात कशी झाली?

उत्तर : अकोला तालुक्यातील वाघा बुद्रुक हे आमचे मूळ गाव. येथे आमची शेती होती. याठिकाणी झालेल्या धरणांमध्ये शेती गेली. वडील पुरुषोत्तम मंत्री हे मुंबईत असणारे माझे मोठे काका गोपालदास यांच्याजवळ आले. त्याठिकाणी वडिलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीची संधी आली; पण स्वतःचा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यानुसार तीन हजार रुपये भांडवल घेऊन वडील सन १९७१ मध्ये कोल्हापूरला आले. त्यांनी येथे फौंड्री उद्योगाला लागणारा कच्चा माल पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी हा व्यापार कष्टाने वाढविला. या व्यापारामुळे फौंड्री उद्योगाचा त्यांचा चांगला अभ्यास झाला. त्यांनी ‘एम.एम. ऑटोमोबाइल्स’ या नावाने सुझुकी, स्वराज माझदाची डीलरशिप घेऊन नवीन व्यवसाय सुरू केला. या व्यापार, व्यवसायाच्या पुढे जाऊन त्यांनी स्वतःची फौंड्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन १९९७ मध्ये त्यांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये जागा घेऊन बांधकाम सुरू केले. जुलै १९९६ मध्ये दोनशे टन दरमहा कास्टिंग उत्पादन करणारी ‘मंत्री मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही फौंड्री सुरू केली. प्रारंभी, शंभर कामगार होते, तर वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल होती.

प्रश्न : कंपनीच्या प्रगतीबाबत काय सांगाल?

उत्तर : आमच्या कंपनीला सन १९९७ मध्ये टाटा मोटर्सची पहिली ऑर्डर मिळाली. सुरुवातीची तीन वर्षे कमी ऑर्डर होत्या. मुंबईतील यूडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर सन २००० मध्ये मी आमची कंपनी जॉइन केली. आटोमोटिव्ह फील्ड माझ्या शिक्षणाच्या दृष्टीने पाहता मला नवीन होते. तीन वर्षे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फौंड्रीतील बारीक-सारीक गोष्टी मी शिकून घेतल्या. फौंड्री उद्योगामध्ये प्रगती करायची असेल, तर उत्पादन क्षमतेचा विस्तार, विविध क्षेत्रांतील उत्पादनांची निर्मिती आणि जागतिक पातळीवर मार्केटिंग वाढविले पाहिजे, हे लक्षात आले. त्यानुसार दरमहा ७०० टनांपर्यंत उत्पादन करण्याची क्षमता वाढविली. ट्रक, ट्रॅक्टरच्या कास्टिंग्जबरोबर बांधकाम साहित्य, डिझेल इंजिनच्या जनसेट निर्मिती क्षेत्रात उतरलो. जगभरातील विविध देशांत मार्केटिंग केले. मशीन शॉप अद्ययावत केले. सध्या आमच्याकडे १५० सीएनसी मशीन्स आहेत. या सर्वांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून आर्थिक ताकद दिली. आम्ही बदल स्वीकारत असताना ग्लोबल सोर्सिंगची नुकतीच सुरुवात झाली होती. त्याची मोठी मदत झाली. आम्हाला जर्मनीतील एका कंपनीची पहिली निर्यात ऑर्डर मिळाली. सन २००५ ते २००८ या कालावधीत मंत्री मेटॅलिक्सने रॅॅपिड ग्रोथ केली. दरमहा दोन हजार टन कास्टिंग्ज निर्मितीची आमची क्षमता झाली. टाटा मोटर्सने दिलेल्या पाठबळाच्या जोरावर उत्तरांचलमध्ये फौंड्री सुरू केली. कोल्हापूरमधील कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अद्ययावत फौंड्री सुरू करून कंपनीचा विस्तार केला. आम्ही अद्ययावत पेंटशॉप असणारी पहिली फौंड्री होण्याचा बहुमान मिळविला. गुंतवणूक वाढली आणि वर्षाकाठी ३०० कोटींपर्यंत उलाढाल पोहोचली. सध्या आमच्या कंपनीमध्ये दोन हजार कामगार कार्यरत आहेत.

प्रश्न : जगभरात ‘मंत्री मेटॅलिक्स’चा ठसा कसा उमटविला?

उत्तर : आपल्या देशाबरोबरच कंपनीला जगभरात नेण्याचे आणि त्याद्वारे कोल्हापूरचा नावलौकिक वाढविण्याचे ध्येय आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे आम्ही जगभरातील विविध देशांचे दौरे केले. त्यातील काही देशांमध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी नेमले. त्याचा चांगला फायदा झाला. आमच्या कंपनीची निर्यात वाढली. सध्या आमच्या एकूण उत्पादनांपैकी ४० टक्के कास्टिंग्जची निर्यात होते. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, यू.के., ब्राझील, मॅॅक्सिको, आदी देशांमध्ये आम्ही निर्यात करतो. ट्रक, ट्रॅॅक्टर, डिझेल इंजिनचे जनसेट, रेल्वे, बांधकाम साहित्य या क्षेत्रांना लागणाऱ्या कास्टिंग्जचे उत्पादन आम्ही करतो. त्यात फ्लॉयव्हील असेंब्ली, हाउजिंग्ज, हॉब्स, ब्रॅकेट, आदींचा समावेश आहे. टाटा मोटर्स लिमिटेड, सिम्पसन अँड कंपनी, टाटा कमिन्स लिमिटेड, स्पाइसर इंडिया लिमिटेड, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जॉनडिअर, अशोक लेलँड, व्हॉल्व्हो, जेसीबी पॉवर सिस्टीम, आदी कंपन्यांना कास्टिंग्ज पुरविले जाते. परवडणाऱ्या किमतीमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन, वेळेवर पुरवठा, नावीन्याचा ध्यास या सूत्रानुसार कार्यरत राहिल्याने कमी वेळेत यशाचे विविध टप्पे आम्ही पूर्ण करीत जगभरात ‘मंत्री मेटॅॅलिक्स’चा ठसा उमटविला आहे.

प्रश्न : कंपनीची पुढील वाटचाल कशी राहणार आहे?

उत्तर : आज आम्ही ग्राहकांनी दिलेल्या डिझाइननुसार त्यांना कास्टिंग्ज तयार करून देण्याचे काम करतो. मात्र, आम्हाला स्वतःचे उत्पादन तयार करायचे आहे. त्यासाठी कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपिंग विंग तयार केला जाणार आहे. फौंड्रीमध्ये आटोमेशन, रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येईल. पुढील पाच वर्षांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल दुपटीने वाढविण्याचे ध्येय आहे. पेट्रोल-डिझेल या इंधनांचे वाढत चाललेले दर, कार्बन इमिशन्स कमी करण्याबाबतचे सरकारचे धोरण पाहता भविष्यात फौंड्री उद्योगासमोर आता हायड्रोजन फ्युएल आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. पारंपरिक वाहनांना जास्त कास्टिंग्ज लागते. याऐवजी इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी ॲल्युमिनिअम, मोल्डेड प्लास्टिकवर आधारित सुटे भाग लागणार आहेत. त्यादृष्टीने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादननिर्मितीची दिशा बदलण्यात येणार आहे.

प्रश्न : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काय केले जाणार आहे?

उत्तर : वडिलांनी मंत्री मेटॅलिक्सची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांना पार्किन्सनचा त्रास सुरू झाला. मात्र, त्यामध्येदेखील त्यांनी जिद्दीने कार्यरत राहून कंपनीचा विस्तार केला. सुरुवातीला मला खूप मार्गदर्शन केले. त्यांनी मला कंपनीमध्ये काम करताना मोकळीक दिली. त्यामुळे जबाबदारी वाढली. ती यशस्वीपणे पेलून कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. त्यामध्ये कामगार, ग्राहक, पुरवठादार, बँक या घटकांचे मोलाचे योगदान आहे. या घटकांच्या साथीने कंपनीला अधिक प्रगतिपथावर नेण्याचा रौप्यमहोत्सवी वर्षातील माझा संकल्प आहे. ग्राहकांना अधिक संतुष्ट करणारी सेवा द्यायची आहे. आमच्या कंपनीतील कामगारांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी मदतीचा हात देणारी स्कॉलरशिप सुरू केली जाणार आहे. भविष्यातील युग हे कोडिंगचे असणार आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना कोडिंगचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने सीएसआर फंडातून कोडिंग लॅॅब उभारण्यात येणार आहे.

चौकट

कुटुंबीय माझी ताकद

दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या कंपनीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात ते नसल्याचे दुःख वाटते. मात्र, त्यांनी दिलेल्या व्हिजन आणि कामाच्या वारशाच्या माध्यमातून ते माझ्याबरोबर सदैव आहेत. आई सरला, पत्नी श्रुती, मुली सिया आणि सारा, बहिणी पूजा आणि अर्चना, हे माझे कुटुंबीय माझी ताकद असून, त्यांच्या पाठबळावर व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मी नेटाने सामना करीत यशस्वी वाटचाल करीत असल्याचे प्रसाद मंत्री यांनी सांगितले.

चौकट

कोल्हापूरने उद्योगाचा वारसा दिला

माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. सेंट झेव्हिअर्स, विवेकानंद कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील ‘यूडीसीटी’मधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. हे शिक्षण घेतले तरी आव्हानात्मक असणाऱ्या ऑटोमोटिव्ह फील्डमध्ये करिअर करण्यात मला आवड होती. त्यानुसार आमच्या कंपनीमध्ये रुजू झालो. वडिलांसह कंपनीतील आणि उद्योग क्षेत्रातील विविध घटकांकडून आणि अनुभवातून शिकत गेलो. मला उद्योगाचा वारसा कोल्हापूरने दिला, असे प्रसाद मंत्री यांनी सांगितले.

चौकट

सामाजिक बांधीलकी

उद्योगाबरोबर आम्ही सामाजिक बांधीलकी जपली आहे. हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथील शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी मदत केली आहे. आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसह विविध मंदिरांतील उत्सवावेळी प्रसाद वाटप केला जातो. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण उपक्रम राबविले जातात. कामगारांंसाठी विविध योजना राबविल्या जातात. कोल्हापुरातील विक्रम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जातात. शिक्षण क्षेत्राला मदतीचा हात देण्यावर वडिलांचा अधिक भर होता. तो धागा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. ‘स्मॅक’च्या उपाध्यक्ष, संचालकपदी मी काम केले आहे. फौंड्री उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या फौंड्री क्लस्टर प्रकल्पाच्या मंजुरीपासून त्याची उभारणी करण्यात योगदान दिले असल्याचे प्रसाद मंत्री यांनी सांगितले.

पॉइंटर

‘मंत्री मेटॅलिक्स’ दृष्टिक्षेपात

स्थापना : जुलै १९९६

कार्यरत क्षेत्र : फौंड्री उद्योग

उत्पादने : फ्लॉयव्हील असेंब्ली, हाउजिंग्ज, हॉब्स, ब्रॅकेट, आदी कास्टिंग्ज

प्लांट : शिरोली, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, उत्तरांचल.

वार्षिक उलाढाल : ३०० कोटी

कार्यरत कामगार : दोन हजार

Web Title: Minister Metallics will change the direction of manufacturing on the strength of new technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.