मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वर्गमित्राकडून 'कोल्हापुरी स्टाईल' सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:52 PM2024-06-17T13:52:27+5:302024-06-17T13:59:03+5:30
कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवत असताना मोहोळ यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले
कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा कोल्हापुरातील मित्रपरिवाराने रविवारी पहाटे पुण्यात पोहोचून खास कोल्हापुरी शैलीत सत्कार केला. या मित्रांनी आपल्या वर्गमित्राचा खारीक आणि खोबरे यांचा तब्बल ३५ किलोंचा हार त्यांच्या गळ्यात घालून पहिलवानी अभिनंदन केले.
१९९० ते १९९४ या काळात कुस्तीचे धडे कोल्हापुरात गिरवत असताना मोहोळ यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळचे त्यांचे वर्गमित्र गुलाबराव देशमुख, प्रशांत घोरपडे, संतोष पोतदार, चंद्रकांत कदम आणि शिवराज देशमुख यांच्यासह विश्वनाथ बनछोडे, अल्लाउद्दीन बालेखान, रणजीत घोडके यांनी हा अनोखा सत्कार केला.
देशात भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापनेनंतर महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे पुण्यातील विमानतळ तसेच सहकार खात्याशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.