मंत्री मुश्रीफांनी सत्तेसाठी पुरोगामी विचार सोडले, रोहित पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:58 AM2024-10-02T11:58:28+5:302024-10-02T11:59:21+5:30
‘महापुरुष अभिवादन यात्रा’ कोल्हापुरात
कोल्हापूर : हसन मुश्रीफ हे सत्तेसाठी महायुतीसोबत गेले, त्यांनी पुरोगामी विचार सोडल्याची टीका राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.
आमदार पवार यांची ‘महापुरुष अभिवादन यात्रा’ कोल्हापुरात आली होती, ‘कर्जत-जामखेड’ मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अंबाबाई, आदमापूरच्या बाळूमामाचे दर्शन घेऊन राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, हसन मुश्रीफ हे गुरुदक्षिणेबाबत बोलत आहेत, पण, एखादा गुरू चांगल्या विचारांचा असेल आणि त्यासाठी आयुष्यभर काम केले असेल तर त्यांचे विचार जपण्याची भूमिका शिष्याने घेतलली पाहिजे. पण, दुर्देवाने मुश्रीफ यांना या विचारांचा विसर पडला आहे. ज्येेष्ठ नेते शरद पवार हे पुरोगामी विचार आणि महाराष्ट्र धर्मासाठी लढत आहेत, त्यांना सोडून ही मंडळी स्वार्थापोटी महायुतीसोबत गेले. यावेळी कल्पेश चौगुले, प्रेम भोसले, मकरंद जोंधळे आदी उपस्थित होते. दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आमदार पवार यांची भेट घेतली.
फडणवीस हे घाबरले आहेत
भाजपला महाराष्ट्रात ६० पेक्षाही कमी जागा मिळणार असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाबरल्याची टीका आमदार पवार यांनी केली.