मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:49 AM2023-01-31T11:49:49+5:302023-01-31T11:50:30+5:30

कोणतेही राजकीय उणेदुणे न काढता गडकरी यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मांडलेल्या व्हिजनची नागरिकांमध्ये चर्चा

Minister Nitin Gadkari's announcements for Kolhapur are good; Dhananjay Mahadik responsibility increased | मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली

मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली

Next

कोल्हापूर : कधी नव्हे ते कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी पूरक ठरणाऱ्या घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळणीमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी बास्टेक ब्रिजच्या पायाभरणी समारंभात केल्या आहेत. खा. धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमामध्ये या घोषणा झाल्याने साहजिकच गडकरींच्या घोषणा केवळ आश्वासने ठरू नयेत, यासाठी आता महाडिक यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.

मुळात बास्केट ब्रिज हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात टीकेचा विषय झाला होता. खा. संजय मंडलिक यांनी त्याची कबुलीही याच कार्यक्रमात दिली. परंतु, महाडिक यांनी या टीकेला उत्तर देताना बास्केट ब्रिजचे भूमीपूजन दणक्यात केले. गडकरी यांनीदेखील पारंपरिक राजकीय भाषण न करता केवळ विकासविषयक मांडणी केली.

हातकणंगले येथील भव्य लॉजिस्टिक पार्क असो किंवा कोल्हापूर- सांगली रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण असो. सांगली रस्त्याने नागरिकांना फार त्रास दिला आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर उत्तम दर्जाचा होणे काळाची गरज आहे. ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पाडतो म्हणाला, तरी पडणार नाही या गडकरींच्या वाक्यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी त्याच आत्मविश्वासाने या रस्त्याचे काम होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी तीन मोठ्या उड्डाणपुलांची मागणी केली आहे. यामध्ये शिवाजी पूल ते सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉनर्र, दाभोळकर चौक, ताराराणी चौक ते मार्केट यार्ड असा पहिला मार्ग आहे. यामुळे पुण्या-मुंबईसह बाहेरून येणारी वाहने थेट उड्डाणपुलावरून पन्हाळा, रत्नागिरी मार्गावर जाऊ शकतील. यासाठी ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दुसरा उड्डाणपूल फुलेवाडी नाका ते शिवाजी विद्यापीठमार्गे राष्ट्रीय महामार्ग असा मागणी करण्यात आला असून फुलेवाडी चौक, रिंगरोड, क्रशर चौक, संभाजीनगर स्टॅंड, कळंबा फिल्टर हाऊस, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठासमोरून राष्ट्रीय महामार्गाकडे असा आहे. यासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर जुना राष्ट्रीय महामार्ग शिये ते भगवा चौक, पोलिस मुख्यालय, धैर्यप्रसाद चौक, ताराराणी चौक, आर्मी कॅम्प, शिवाजी विद्यापीठ ते उजळाईवाडी राष्ट्रीय महामार्ग असा तिसरा ४०० कोटींचा उड्डाणपूल महाडिक यांनी सूचवला आहे.

एकूण २ हजार कोटींची मागणी

हे तीन उड्डाणपूल आणि शहरातील रस्ते यासाठी सीआरआयएफ रस्ते विकास निधीसह एकूण २ हजार कोटी रुपयांची मागणी महाडिक यांनी गडकरी यांच्याकडे केली असून कोल्हापूर महापालिकेला ७५ इलेक्ट्रिकल बसेसचीही मागणी केली आहे. याबाबत गडकरी सकारात्मक दिसले आहेत. मात्र, त्यासाठी महाडिक यांना पाठपुरावा करावा लागणार असून राज्य शासनाचा वाटा देण्यासही तयार करावे लागणार आहे.

गडकरींच्या भाषणाची चर्चा

कोणतेही राजकीय उणेदुणे न काढता गडकरी यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मांडलेल्या व्हिजनची नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. कोल्हापूरबद्दल छातीठोकपणे ‘देतो’ असे सांगणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे. कारण शिवाजी विद्यापीठापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंत जाहीर झालेले पैसेही पदरात पडलेले नाहीत. अशा परिस्थितीत गडकरींचे भाषण वास्तवात उतरावे, अशी कोल्हापूरवासियांची अपेक्षा आहे.

Web Title: Minister Nitin Gadkari's announcements for Kolhapur are good; Dhananjay Mahadik responsibility increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.