खासदार मंडलिकांनी केलेल्या ‘आदानी-अंबानी’ टीकेवर सतेज पाटील अस्वस्थ : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 11:30 AM2022-01-04T11:30:48+5:302022-01-04T11:31:58+5:30

शिवसेनेला तिसरी जागा देण्याची तयारी होती, काही नेत्यांना मान्य होते. मात्र, राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी निवडणूक लादली.

Minister Satej Patil angry over MP Sanjay Mandlik's criticism of Adani Ambani says | खासदार मंडलिकांनी केलेल्या ‘आदानी-अंबानी’ टीकेवर सतेज पाटील अस्वस्थ : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

खासदार मंडलिकांनी केलेल्या ‘आदानी-अंबानी’ टीकेवर सतेज पाटील अस्वस्थ : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Next

कोल्हापूरबँकेच्या प्रचार सभेत खासदार संजय मंडलिक यांनी ‘आदानी-अंबानी’ अशी टीका केली. वास्तविक ते खासदार आहेत, अशा प्रकारची टीका करणे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. माझ्यावरील टीका समजू शकतो. मात्र, त्या टीकेने सतेज पाटील अस्वस्थ झाल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा बँकेमुळे नाही तर कारखाना व्यवस्थापनाच्या चुकीच्या कारभारामुळेच आजरा साखर कारखाना बंद पडला, असा पलटवार करत संजय मंडलिक हे बँकेचे संचालक असताना एकदाही ‘आजरा’ व ‘गडहिंग्लज’ कारखान्याच्या कर्जाच्या प्रस्तावावर का बोलले नाहीत? असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी केला. सहा वर्षांतील चांगल्या कारभारामुळे सभासद समाधानी असल्याने सत्तारूढ आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिवसेनेला तिसरी जागा देण्याची तयारी होती, काही नेत्यांना मान्य होते. मात्र, राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी निवडणूक लादली. आमचे सगळे पॅनल निवडून येणार असल्याने पीक कर्ज, खावटी, किसान साहाय्य कर्जाची मर्यादा वाढवत असताना त्याचा व्याजदर कमी करण्याचा मानस आहे.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, बँक कोणाच्या ताब्यात गेली पाहिजे, हे सुज्ञ सभासदांना माहिती आहे. बहुमताचा विषय नाही, नऊ जागा निवडून येण्यात कोणतीच अडचण नाही. आमदार पी. एन. पाटील म्हणाले, सभासदांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहता, विरोधकांनी कशासाठी पॅनल केले, हेच कळत नाही. कोणाचीही अडवणूक केली नसल्याने सगळे पॅनल निवडून येण्यात अडचण नाही. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, राजेश लाटकर, मधुकर जांभळे, शिवाजी कवठेकर आदींची उपस्थिती होती.

‘भोगावती’ने कर्जाची परतफेड केल्यानेच मदत

‘भोगावती’च्या तुलनेत ‘आजरा’ व ‘गडहिंग्लज’ कारखान्याला मदत केली नसल्याचा आरोप प्रकाश आबीटकर यांनी केला. याबाबत आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘भोगावती’ने बँकेकडून कर्ज घेतले आणि त्याची वेळेत परतफेड केली. एनपीएमध्ये घालवले नाही. ‘आजरा’, ‘गडहिंग्लज’ला दोन वेळा कर्ज परतफेडीस मुदत दिली होती, त्यांनी पैसे भरले नाहीत.

मग तुम्हाला भाजप कसे चालते?

आम्ही भाजपला जवळ केले म्हणून टीका करणाऱ्यांच्या पॅनेलमध्ये भाजप व त्यांच्या मित्रपक्ष रिपाइं कसे चालते. आमच्या पॅनेलमध्ये एकही भाजपचा कार्यकर्ता नाही, उलट आमदार विनय कोरे व आमदार प्रकाश आवाडे यांच्यासाठी त्यांनी सगळे अर्ज मागे घेतल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

ती चर्चा विजय देवणेंनी सांगावी

ईडी च्या भितीपोटी आपण चंद्रकांत पाटील यांच्याशी जुळवून घेतल्याचे विजय दे‌वणे सांगत आहेत. ते चुकीचे असून हे प्रकरण न्यायालयात आहे. आमच्यात काय समझोता झाला, हे देवणेंना माहिती असेल तर सांगावे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Minister Satej Patil angry over MP Sanjay Mandlik's criticism of Adani Ambani says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.