गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी महत्वाची माहिती लपवली : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 05:35 PM2021-11-24T17:35:31+5:302021-11-24T18:21:30+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे निवडणूक लढवीत असलेले गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाची ...
कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे निवडणूक लढवीत असलेले गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाची माहिती लपवली आहे, तरीही त्यांचा अर्ज वैध ठरला. याबाबत उद्या, गुरुवारी उच्च न्यायालयात दाद मागणार. जरी ते निवडून आले तरी त्यांना तीन महिन्यात अपात्र ठरवणार, असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील जमिनीची माहिती अर्जात लपवली आहे. त्याचबरोबर ताराराणी चौक येथील जमिनीची खोटी माहिती नमूद केली आहे. कॉसमॉस बँकेतून घेतलेल्या कर्जाचीही माहिती त्यांनी आपल्या अर्जात लपवली असल्याचे गंभीर आरोप धनंजय महाडिक यांनी यावेळी केले.
विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार गृह राज्यमंत्री सतेज पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे एकमेंकाचे कट्टर विरोधी पुन्हा आमने सामने आले आहेत.
आज, अर्ज छाननीचा दिवस होता. यावेळी सकाळच्या सुमारासच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाटील-महाडिक कार्यकर्ते समोरासमोर भिडले. यावेळी एकच गोंधळ उडाला. या गोंधळानंतर परिस्थिती तणावपुर्ण बनली होती.