Rajendra Patil: मंत्री यड्रावकरांच्या समर्थनात-विरोधात मोर्चा, पोलिसांसोबत झटापट; वातावरण तणावपुर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:41 PM2022-06-27T12:41:12+5:302022-06-27T13:32:51+5:30
यड्रावकरांच्या कार्यालयाकडे जाण्याव अटकाव केल्याने शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. अन् शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयावर आगेकुच केली.
कोल्हापूर : शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. यातील एक गट समर्थनात तर दुसरा गट विरोधात रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटात सामील झाल्याने आता त्यांच्या विरोधात जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. तर, आम्ही यड्रावकर म्हणत हजारो समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटले आहेत. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटात सामील झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यानंतर शनिवारी संतप्त शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांचे फलकावरील फोटो फाडून निषेध केला. यानंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपुर्ण बनले.
दरम्यान आज, सोमवारी शिवसैनिक यड्रावकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांनी खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसैनिकांना यड्रावकरांच्या कार्यालयापर्यंत जावू न दिल्याने शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. अन् शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयावर आगेकुच केली.