मंत्र्यांची समिती अमान्य

By admin | Published: May 20, 2015 12:19 AM2015-05-20T00:19:35+5:302015-05-20T00:23:18+5:30

गांधीनगर वाद : पुतळा संवर्धन समितीची बैठकीत स्थापना

Ministers committee invalid | मंत्र्यांची समिती अमान्य

मंत्र्यांची समिती अमान्य

Next

कोल्हापूर : गांधीनगर (ता़ करवीर) येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमलेली समिती आंबेडकरी संघटनांना मान्य नाही़ आंबेडकरांच्या पुतळ्याचे संरक्षण हा एका गटाचा प्रश्न नसून संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे़ त्यामुळे ‘आरपीआय’च्या एका स्वार्थी गटास हाताशी धरून पालकमंत्र्यांनी घोषित केलेली समिती ‘बालक समिती’ आहे, अशी टीका आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली.
यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पुतळा संरक्षणासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा संवर्धन समितीची स्थापनाही करण्यात आली़
गांधीनगरातील शिरू चौकातील डॉ़ आंबेडकरांच्या पुतळ्यावरील वादावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १८) पाचसदस्यीय समितीची स्थापना केली; पण या समितीमध्ये आंबेडकरी चळवळीतील प्रा़ शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे हे दोनच प्रतिनिधी आहेत़ इतर आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही़ या पार्श्वभूमीवर येथील शाहू स्मारक भवनामध्ये मंगळवारी ही बैठक झाली़ यावेळी विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांनी सिंधी समाज, पालकमंत्री आणि आठवले गटाचा तीव्र निषेध केला़ अध्यक्षस्थानी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर होते़
आरपीआय (गवई गट) गटाचे अध्यक्ष प्रा़ विश्वासराव देशमुख म्हणाले, पालकमंत्र्यांनी समिती स्थापन करताना सर्व आंबेडकरी-पक्ष संघटनांना विश्वासात घ्यायला हवे होते़; पण भाजप-शिवसेनेशी लागेबांधे असलेल्या ‘आरपीआय’च्या गटाच्या दोन नेत्यांना समितीमध्ये घेण्यात आले आहे़
दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक म्हणाले, पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणाऱ्या कोल्हापुरात घटनेच्या शिल्पकाराच्या पुतळ्याला होणारा विरोध दुर्दैवी आहे; पण हा पुतळा आहे तिथेच सन्मानाने बसविण्यास आंबेडकरी कार्यकर्ते कटिबद्ध आहेत़
दलितमित्र व्यंकाप्पा भोसले म्हणाले, आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी बसविण्यासाठी आता शासनानेच योग्य तो हस्तक्षेप करावा़ जातीय मानसिकता आजही लोकांच्या मनात घर करून आहे, हे सिंधी समाजाच्या विरोधातून दिसून येते़ यावेळी ‘पीआरपी’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष बाजीराव नाईक, लोकजनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, ब्लॅक पँथरचे संस्थापक सुभाष देसाई, अस्मिता दिघे, सोमनाथ घोडेराव, प्रशांत वाघमारे, प्रा़ जी़ बी़ अंबपकर, आदी विविध संघटनेचे नेते, कार्यकर्त्यांची भाषणे झाली़ (प्रतिनिधी)


गांधीनगर येथे डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. शासनस्तरावरील उर्वरित मान्यतेच्या कामासाठी आंबेडकरवादी जनतेने संयमाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पालकमंत्र्यांची समिती बरखास्त करावी
पालकमंत्र्यांनी डॉ़ आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेली समिती बरखास्त करावी, असे निवेदन डॉ़ आंबेडकर पुतळा संवर्धन समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी यांना दिले़ आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी सन्मानाने बसवावा. पुतळा हलविल्यास संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही या निवेदनात दिला आहे़

Web Title: Ministers committee invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.