मंत्री, शासकीय अधिकारी स्वतः चालविणार सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:30+5:302021-03-07T04:22:30+5:30
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित शासकीय सभागृहाचा देखभालीचा खर्च कशातून करायचा यावरून हे सभागृह सध्या दुरवस्थेत जात आहे. ...
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित शासकीय सभागृहाचा देखभालीचा खर्च कशातून करायचा यावरून हे सभागृह सध्या दुरवस्थेत जात आहे. यावर उपाय म्हणून मंत्री हसन मुश्रीफ आणि तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी आपल्या वैयक्तिक खर्चातून दरमहा वर्गणी काढून हा खर्च करणार आहेत. एखाद्या नाट्यगृहासारखे असलेल्या या सभागृहाची उभारणी हसन मुश्रीफ हे नगरविकास मंत्री असताना झाली आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. ही बैठक या वातानुकूलित सभागृहात घेण्याचे ठरले होते; पण वीज पुरवठा सुरू नसल्याने डी. आर. माने महाविद्यालयाच्या आवारात ही बैठक घेण्यात आली. तेव्हा मंत्री मुश्रीफ म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी असे भव्य वातानुकूलित शासकीय बहुउद्देशीय सभागृह कागलमध्ये असून, त्याची देखभाल होत नाही हे खेदजनक आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्याकडून स्वतःचे दरमहा दहा हजार रुपये खर्चासाठी देण्याचे जाहीर केले. त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी पंडित पाटील, बांधकाम विभागाचे व्ही. डी. शिंदे, पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी चांदणे यांनीही दरमहा आपल्या पगारातून काही रक्कम देण्याचे जाहीर केले. अशा पद्धतीने मंत्री आणि शासकीय अधिकारी आपल्या पैशातून शासकीय सभागृह चालविण्याची ही पहिलीच घटना ठरेल. कोरोना आढावा बैठकीस प्रांताधिकारी रामहरी भोसले, विविध शासकीय अधिकारी यांच्यासह जि. प. सदस्य युवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट.
कागल शहरात लसीकरणाची सोय
ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण सुरू आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज दोनशे जणांना ही लस दिली जाते. ४५ वर्षे वयावरील इतर व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना ही लस देणे सुरू आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. कागल शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या जिल्हा परिषद दवाखान्यात ही लस देणे सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले.