महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:46 AM2022-03-28T10:46:10+5:302022-03-28T10:46:48+5:30

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच

Ministers in Mahavikas Aghadi should fill their bags: Chandrakant Patil | महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या : चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या : चंद्रकांत पाटील

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जाते. मात्र, सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार असून, मी जे म्हणत गेलो तेच होत गेले. जे जात्यात होते त्यांचे पीठ झाले आणि जे सुपात होते ते आता जात्यात जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो, असा सूचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  पत्रकारांशी बोलताना दिला.

शिवसेना पदाधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ईडीला सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला २ कोटी व ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. कोणाच्या घरी काय सापडले, त्यात काय आहे हे मला माहिती नाही. मात्र,  खूप काहीतरी होणार आहे, असे दिसते.

नव्या धमकीबद्दल धन्यवाद : संजय राऊत 
संजय राऊत यांनी माझी केलेली चेष्टा त्यांना महागात पडेल, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राऊत यांनी पलटवार केला आहे. ‘नव्या धमकीबद्दल धन्यवाद. महाग पडेल म्हणजे? ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबविणार, मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा तुम्ही वापरता, चेष्टा करता ते सहन करायचे? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय.’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी पाटील यांना सुनावले.

उद्धव ठाकरेंची कुंडली बघायची आहे
उद्धव ठाकरे हे भाग्यवान आहेत. त्यांची कुंडली बघायची आहे. कशाचे साेयरसूतक नाही. कोणी त्यांना अडवूच शकत नाही, कारण सगळ्यांची मजबुरी आहे. ठीक आहे, काही जणांचे भाग्य असते, पण प्रश्न तरी सुटले पाहिजेत. ते त्यांच्याकडून होत नसल्यानेच लोक एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे जातात.

राज्य सरकार ठाकरे नव्हे, तर पवारच चालवतात
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकार उद्धव ठाकरे नव्हे, तर अजित पवारच चालवतात, ही वस्तुस्थिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परवा विधिमंडळात विनंती केली. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त त्यांच्याकडेच आहे. ते धाडसी आहेत, बाकीचे सगळे भेकड आहेत.

 

Web Title: Ministers in Mahavikas Aghadi should fill their bags: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.