मंत्रिपदाच्या स्पर्धेत मिणचेकर, नाईक, खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:00 AM2018-10-27T00:00:00+5:302018-10-27T00:00:08+5:30
कोल्हापूर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजून मंत्रिमंडळ विस्तारीकरणास परवानगीच न दिल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. या संभाव्य विस्तारात ...
कोल्हापूर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजून मंत्रिमंडळ विस्तारीकरणास परवानगीच न दिल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. या संभाव्य विस्तारात शिवसेनेकडून हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना आरोग्यमंत्री म्हणून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपकडून ज्येष्ठ आमदार शिवाजीराव नाईक व सुरेश खाडे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
गेले काही दिवस राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे; त्यामुळे त्याचे काय झाले यासंबंधीची माहिती सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांकडून घेतली असता, जोपर्यंत भाजपचे केंद्रीय नेतृत्व यादीला परवानगी देत नाही, तोपर्यंत हा विस्तार होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक यश शिवसेनेला दिले; त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून जिल्'ाला पहिल्या टप्प्यातच संधी मिळायला हवी होती; परंतु आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच राहिली. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत या दोघांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले नाही, अशा तक्रारी झाल्याने त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह लागले. गेल्याच आठवड्यात आमदार क्षीरसागर यांनी आपल्याला मंत्रिपद नको, अशी जाहीर भूमिका घेतली, याचा अर्थ त्यांना ते मिळणार नाही, हे स्पष्टच होते.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याबद्दल पक्ष व सरकारच्या पातळीवरही कमालीच्या तक्रारी आहेत; त्यामुळे त्यांना डच्चू दिला जाणार आहे. तिथे डॉक्टर असलेल्या आमदार मिणचेकर यांना संधी मिळू शकते. मिणचेकर हे मृदू स्वभावाचे आहेत; त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले, तरी अन्य कोणी दुखावले जाणार नाही. मागासवर्गीय समाजातील असल्याने तीदेखील त्यांची जमेची बाजू आहे.
भाजपकडून नाईक की खाडे असा विचार पक्षाकडून सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे मंत्रिमंडळातील दोन नंबरचे वजनदार मंत्री कोल्हापुरात असल्याने आमदार सुरेश हाळवणकर यांना संधी मिळण्याची शक्यता नाही. नाईक व खाडे हे दोघेही मंत्रिपदासाठी सक्षम व पात्र आहेत. खाडे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत. नाईक यांची मात्र ही भाजपकडून पहिलीच टर्म आहे; परंतु ग्रामविकासातील अत्यंत अभ्यासू आमदार, अशी त्यांची प्रतिमा आहे.