मिरजेत शिवसेना संपर्कप्रमुखांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड
By admin | Published: April 22, 2015 11:41 PM2015-04-22T23:41:01+5:302015-04-23T00:33:51+5:30
आंदोलन-प्रतिआंदोलन : गटबाजी चव्हाट्यावर
मिरज : शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करीत, मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढली. मार्केट चौकात त्यांच्या पुतळ्यास शेण फासण्यात आले. या प्रकारानंतर दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी बानुगडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून पोलिसांत तक्रार दिली.
शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीतून संपर्कप्रमुखाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीतून हा प्रकार घडल्यानंतर संपर्कप्रमुख बानुगडे पाटील समर्थक गटानेही मोर्चा काढला.
शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी व माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार, बजरंग पाटील यांच्या गटात वैमनस्य आहे. पदाधिकारी निवडीवरून दोन्ही गटात पराकोटीचा संघर्ष आहे. तालुकाप्रमुख निवडीवरून सूर्यवंशी समर्थक रवी नाईक यांनी बजरंग पाटील समर्थक चंद्रकांत मैगुरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी चाकू हल्ला केला होता. जोरदार गटबाजीमुळे मिरज तालुक्यातील पदाधिकारी निवडी स्थगित आहेत.
बुधवारी संपर्कप्रमुख बानुगडे-पाटील सांगलीच्या दौऱ्यावर होते. त्यांची सांगलीत बैठक सुरू होण्यापूर्वी तालुकाप्रमुख रवी नाईक, गजानन मोरे, आनंद रजपूत यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी दुपारी किल्ला भागातून मार्केटमधील श्रीकांत चौकापर्यंत बानुगडे-पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावर बसवून धिंड काढली. पुतळ्यास चपलाचा हार घालून श्रीकांत चौकात शेण फासण्यात आले. बानुगडे-पाटील पैसे घेऊन शिवसेनेची पदे देत असल्याचा आरोप करीत रवी नाईक यांनी त्यांचा निषेध केला. आंदोलनात भगवे झेंडे व शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र घेऊन कार्यकर्ते सहभागी होते.
संपर्कप्रमुखांच्या पुतळ्याची धिंड काढणारे जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांचे समर्थक मानले जातात. या घटनेनंतर बानुगडे-पाटील यांच्या समर्थनासाठी सूर्यवंशी विरोधक गटाचे कार्यकर्ते जमले. चंद्रकांत मैगुरे, विशाल रजपूत, सुनीता मोरे, संजय काटे, बबन गायकवाड, सचिन कोरे, महादेव सातपुते यांनी बानुगडे-पाटील यांच्यावरील आरोपांचा निषेध करीत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संपर्कप्रमुखांचा पुतळा जाळल्याबद्दल रवी नाईक, आनंद रजपूत, गजानन मोरे या तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांनी संपर्कप्रमुखांविरोधातील आंदोलनाशी संबंध नसल्याचा पवित्रा घेतला आहे. (वार्ताहर)