मिरजेत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज गायब?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2016 12:08 AM2016-08-20T00:08:33+5:302016-08-20T01:01:14+5:30
पीडिता आत्महत्या प्रकरण : खंडणीच्या गुन्ह्यातील सूत्रधाराबाबत गूढ
मिरज : मिरजेतील बलात्कार पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या कृतीबद्दल वाद सुरू असताना गांधी चौक पोलिस ठाण्यातील दि. ६ आॅगस्टचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब होण्यामागे वरिष्ठांचा हात असल्याच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
बलात्काराची फिर्याद देणाऱ्या तरुणीवर संशयित अमित कुरणेच्या आईने खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर गांधी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. अन्य सहाजणांची अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडून चौकशी सुरू आहे.
दि. ६ रोजी दुपारी पीडितेविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील तीन व गांधी चौक पोलिस ठाण्यातील एक अशा चौघांनी मध्यस्थी करून खंडणीची फिर्याद घेतली व गुन्हा दाखल केल्याची तक्रार आहे. गांधी चौक पोलिस ठाण्यात चार सीसीटीव्ही असून, या सीसीटीव्हीत दि. ६ आॅगस्टचा संपूर्ण घटनाक्रम चित्रित झाला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर संबंधित सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी गांधी चौक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर वरिष्ठांच्या कार्यालयात नेण्यात आला. त्यानंतर संबंधित चित्रण गायब झाल्याची तक्रार अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
पीडितेच्या नातेवाइकांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणाचा सहभाग होता, याच्या चौकशीची मागणी केल्याने, या खंडणी प्रकरणाबाबत गूढ निर्माण झाले आहे. पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याबाबत पोलिस अधिकारी परस्परांकडे बोट दाखवित आहेत. सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली असून खंडणी प्रकरणात नेमका सूत्रधार कोण, याबाबत संशय निर्माण झाला आहे. (वार्ताहर)