मिरज पोलिसाची चौकशी होणार
By admin | Published: April 2, 2016 12:34 AM2016-04-02T00:34:59+5:302016-04-02T00:37:28+5:30
बुलेट प्रकरण : मैनुद्दीनच्या पैशावर भावाच्या नावे घेतली बुलेट
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील आरोपी मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून तडजोडीवर बुलेट खरेदी करणारा मिरज गांधी चौक पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ याला बुधवारी (दि. ६) चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी काढले. कॉन्स्टेबल इरफान याने ही बुलेट भाऊ साजिद नदाफ याच्या नावावर खरेदी केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्या आदेशानंतर मिरज पोलिसांच्या चौकशीला गती आली आहे.
मैनुद्दीन मुल्ला चोरीनंतर सांगली-मिरज परिसरात वावरत होता. त्याने मिरजेत ‘वसुली’ करण्यात माहीर असलेल्या काही पोलिसांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या पार्टीत वारणानगर येथून कोट्यवधी रुपयांचे घबाड चोरल्याचे त्याने सांगितले.
त्यावर पोलिसांनी कोणी काय घ्यायचे, याविषयी मुल्लाशी चर्चा केली. त्यानंतर मैनुद्दीनने सांगली येथील अभय शोरूम येथून ३ लाख सहा हजार किमतीमध्ये दोन बुलेट मोटारसायकली खरेदी केल्या. त्यामध्ये मैनुद्दीन स्वत: वापरत असलेली बुलेट सासू नानुबाई भोरे हिच्या नावावर आहे. दुसरी भाऊ साजिद नदाफ याच्या नावावर आहे.
या दोन्ही बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. कॉन्स्टेबल इरफान हा मिरज गांधी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्यासह भाऊ साजिदला बुधवारी (दि. ६) चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठविली आहे. इरफानचा चौकशी अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांना पाठविला जणार आहे. मैनुद्दीनने जबाबामध्ये कॉन्स्टेबल इरफानने आपल्याकडून बुलेट घेतल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे चौकशीनंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाची सांगली पोलीस दलाच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव करत आहेत. (प्रतिनिधी)
ओल्या पार्टीची चौकशी
मिरज येथे ‘वसुली’ करणाऱ्या पोलिसांनी मैनुद्दीनसोबत ओली पार्टी केली. त्यावेळी झालेल्या तडजोडीमध्ये एका पोलिसाने पाच लाख रुपये फ्लॅट खरेदी करण्यासाठी घेतले तर इरफान नदाफ याने बुलेट खरेदी केली. या पार्टीची बातमी फुटल्यावर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मिरजेतील बेथेलहॅमनगरमध्ये मैनुद्दीनकडून तीन कोटींची रक्कम हस्तगत केली; परंतु सांगली पोलिसांनी ‘पार्टी’ची चौकशी केली नाही. कोल्हापूर पोलिस मात्र या ओल्या पार्टीची कसून चौकशी करत आहेत.
शोरुम मालकास मनस्ताप
मैनुद्दीन मुल्ला याने चोरीच्या पैशांतून दोन बुलेट सांगलीतील अभय शोरूममधून तीन लाख सहा हजार किमतीला खरेदी केल्या. पोलिसांनी या दोन्हीही बुलेट ताब्यात घेतल्या. या प्रकरणी पोलिसांनी शोरूमचे मालक दर्शन पाठक व काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दर्शन पाठक यांना मैनुद्दीनने दिलेले तीन लाख सहा हजार रुपये पोलिसांकडे तपासकामी जमा करण्याची नोटीस बजावली आहे. पाठक यांनी शुक्रवारी रात्री ते पैसे पोलिसांच्या ताब्यात दिले.